हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळा सुरू असून अनेक साधू, संत, भाविक यात सहभागी झाले आहेत. नेहमीप्रमाणे विविध आखाड्यांचे संत, महंत आणि नागा साधूही शाही स्नान करत आहेत. याच संदर्भात वादग्रस्त पोस्ट करणे अभिनेता करण वाही याला चांगलेच महागात पडले आहे. यावरून सोशल मीडियावर त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आपल्याला जिवे मारण्याची धमकीही मिळाली असल्याचे करण वाहीने सांगितले.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर बनण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी शाही स्नानासाठी दुपारपर्यंतच दहा लाख भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या कोरोना प्रतिबंधक नियमांना अगदी पायदळी तुडवल्याचे दिसून आले. परिणामी गेल्या ४८ तासांत येथे एक हजार सातशे जणांना कोरोना झाल्याचे समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर अभिनेता करण वाही याने हरिद्वार येथील कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी जमलेल्या नागा सांधूंबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यानंतर त्याला सोशल मीडियावरून ही पोस्ट तात्काळ हटवण्यासाठी मेसेज येऊ लागले. काहींनी हिंदू धर्माचा एवढा तिरस्कार का करता? असा सवालही त्यासमोर उपस्थित केला. तर काहींनी अगदीच अर्वाच्य भाषेत त्याला मेसेज केले आहेत.
करणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नागा सांधूंना वर्क फ्रॉम होम नाही का? असा सवाल उपस्थित केला होता. नागा साधूंसाठी वर्क फ्रॉम होम सारखे कल्चर नाही का? गंगा नदीमधून पाणी नेऊन घरी स्नान करू शकत नाही का? असा सवाल करणने या पोस्टमधून उपस्थित केला होता. यानंतर त्याला सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या.
आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांचे स्क्रिनशॉट करणने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. अनेकांनी त्याला हिंदूंच्या भावना दुखावल्याबाबत माफी मागण्यास आणि पोस्ट डीलिट करण्याचा सल्ला दिला आहे. मला शिवागाळ होत असून माझ्याविरोधात मेसेज केले जात आहेत. मला जिवे मारण्याची धमकीही मिळत आहे. हिंदू होण्याचा अर्थ कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करणे असेल तर तुम्हाला शिक्षण घेण्याची गरज आहे, अशी पोस्ट करण वाही याने केली आहे.
Discussion about this post