हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात लोकशाहीर साबळे यांचा जीवनपट आहे. या चित्रपटात शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. तसेच शाहिरांच्या पत्नी भानुमती यांच्या भूमिकेत केदार शिंदे यांची लेक सना शिंदे दिसणार आहे. अशातच चित्रपटात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिका कोण साकारणार..? याबाबत विविध अभिनेत्रींची नावे पुढे आली होती. यात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या नावाने मात्र जोर धरला आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन आता अंतिम टप्प्यावर सुरू असून येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी चळवळ पेटवली. या दरम्यान ते अनेक मान्यवरांच्या सानिध्यात आले. यामध्ये साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण अशा अनेक नावांचा समावेश आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने हि व्यक्तिमत्त्वे आपल्याला रुपेरी पडद्यावर भेटणार आहेत. चित्रपटात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची व्यक्तिरेखा अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारल्याने म्हटले जात आहे. मात्र अजूनतरी निर्मात्यांनी याबाबत गुप्तता राखली आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, तसेच अनेक मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मोकळा श्वास’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या चित्रपटात तिने अतिशय लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’, ‘सा रे ग म प’ अशा मालिका आणि टीव्ही शोच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनात पोहोचली. इतकेच काय तर तिने ‘मन फकीरा’, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. त्यामुळे उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शक अशीही तिची ओळख आहे.
Discussion about this post