हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रचंड बहुचर्चित तसाच बहुप्रतीक्षित आहे. या चित्रपटातून केदार शिंदेंचे आजोबा म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी हा शाहिरांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शाहिरांचं बालपण कोण साकारणार..? असा एक प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. ज्याचं उत्तर बालदिनाच्या निमित्ताने केदार शिंदेनी पोस्टर शेअर करून दिले आहे.
केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘कुठल्याही मोठ्या वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा बिजापासूनच होते.. बीज रुजते, संस्कारांचे खत पाणी त्याला मिळते.. फक्त त्या बीजाला सातत्याने धडपड करायची असते जमिनीतून वर उठून आकाशाकडे झेपवायची.. तेव्हाच तो डेरेदार वृक्ष होऊन अनेकांना सावली देऊ शकतो.. ही कथा सुद्धा अशाच एका वटवृक्षाची.. शाहीर साबळे ह्यांची.. आज बाल दिना निमित्ताने त्याच वटवृक्षाच बीज रूप तुमच्या समोर सादर करतोय.. कंठात सुमधुर स्वर आणि डोळ्यात अनेक स्वप्न – हा आहे छोटा ‘कृष्णा गणपत साबळे!’ शाहिरांच्या बालपणीच्या भूमिकेत बालकलाकार देवा.’
याआधी केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चित्रपटातील दोन बालकलाकारांसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये बालकलाकार देवदत्त आणि सांची भोयार हे दोघेही आहेत. हा फोटो शेअर करताना या फोटोसोबत केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मला नवीन पिढीसोबत काम करायला आवडते.. खूप काही शिकण्यासारखे आहे.’ आता हळू हळू चित्रपटातील नवनवीन पात्र समोर येत आहेत. शिवाय चित्रपटाचे चित्रीकरण देखील जोमात सुरु आहे. आता उत्सुकता आहे ती प्रदर्शनाची…
Discussion about this post