हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये हिंसक आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत २० पेक्षाही अधिक आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत आता भारतीय कलाकारांबरोबरच आता परदेशी कलाकारही या आंदोलनात आवाज उठवत आहेत. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉन क्यूसेक याने दिल्लीतील हिंसाचारावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
अभिनेता जॉन हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडीं बद्दल तो नेहमीच मुक्तपणे प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “हा फॅसिझम नाही तर काय आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष स्वत:च राष्ट्र असल्याचं मिरवत आहेत.त्याचवेळी दुसरीकडे तिथं दिल्ली जळत आहे.” अशा शब्दांमध्ये जॉन क्यूसेक यानं ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे.
ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये बेफामपणे सशस्त्र हिंसाचार केला. या परिसरात अराजकतेने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले. या हिंसाचारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी संध्याकाळीपासून मौजपूर, चाँदबाग, जाफराबाद आणि करवालनगर हे भाग अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंगळवार पासून या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीतील पाचही मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्यात आले आहेत. अन्य संवेदनशील भागांमध्येही जमाव बंदी लागू करण्यात आली असून सहा हजार पोलीस, शीघ्रकृती दलाचे जवान, निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.