हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु होणार आहे. येत्या २ फेब्रुवारी २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा महोत्सवासाठी विविध ७२ देशांमधून १५७४ चित्रपट आले असून त्यापैकी केवळ १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती जब्बार पटेल यांनी दिली आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यांच्यासह पुणे फिल्म फाउंडेशन विश्वस्त सबिना संघवी, सतीश आळेकर, मोहन आगाशे आणि महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे हे मान्यवर उपस्थित होते. यावर्षीचा महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून अर्थात गुरुवार दिनांक ५ जानेवारी २०२३ पासून www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होईल. तसेच चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया ही गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. माहितीनुसार, पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन – सेनापती बापट रोड, आयनॉक्स – कॅम्प परिसर आणि राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) – लॉ कॉलेज रोड या ठिकाणी एकूण ९ पडद्यांवर महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवाचे नोंदणी शुल्क रुपये ८०० असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी ६०० रुपये असणार आहे. महोत्सवात समाविष्ट असलेले चित्रपट हे ‘ए प्लस ग्रेड’चे असल्याचीही माहिती पटेल यांनी दिली. यंदाच्या महोत्सवाबद्दल बोलताना डॉ जब्बार पटेल म्हणाले कि, ‘यावर्षी जानेवारी महिन्यात नियोजित असलेला महोत्सव आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरविले आहे. आधीच्या तारखांदरम्यान जी २० परिषद संबंधी बैठका या पुण्यात होणार होत्या, त्या दरम्यान सेनापती बापट रस्त्यांवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये महोत्सवाच्या ६ स्क्रीन्स होत्या. मात्र या ठिकाणी प्रशासनावरील ताण आणखी वाढू नये म्हणून आम्ही प्रशासनाच्या विनंतीचा स्वीकार करीत तारखा पुढे ढकलल्या.’
Discussion about this post