हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परेश मोकाशी दिग्दर्शित थ्रिलकॉम चित्रपट ‘वाळवी’ने बॉक्स ऑफिस प्रचंड गाजवला. अगदी चित्रपटगृहातील प्रत्येक प्रेक्षकांच्या डोक्याला मुंग्या आणून या चित्रपटाने यशाची एक वेगळीच सीमा गाठली. चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय सगळं कसं क्लास.. यामुळे वाळवीने मनोरंजन विश्व गाजवलं म्हणायला हरकत नाही.
पण अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट वेळेअभावी किंवा कामाच्या व्यापात थिएटरमध्ये पाहता आला नाही. तर या प्रेक्षकांनी आता नाराज व्हायचं कारण नाही. तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुमच्याच घरात बसून तुमच्या टीव्हीवर हा चित्रपट तुम्ही आता पाहू शकणार आहात.
परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे कोणताही प्रेक्षक कधीही आणि कुठेही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. येत्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘वाळवी’ चित्रपटाचा प्रीमियर होतो आहे. त्यामुळे आता २४ फेब्रुवारीपासून प्रेक्षक घरबसल्या वाळवी पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘वाळवी’ हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरला. अतिशय वेगळ्या धाटणीचा आणि मांडणी केलेला हा चित्रपट फुल्ल पॅकेज आहे.
मराठी सिनेसृष्टीतील पहिला वहिला थ्रिलकॉम चित्रपट म्हणून ‘वाळवी’ने बॉक्स ऑफिस अगदी दणाणून सोडलं. हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा गर्दी केल्याचे दिसून आले. यानंतर अलीकडेच ‘वाळवी’ अमेरिकेत रिलीज झाला आणि तिकडेही लोकप्रिय ठरला. यानंतर वाळवी’च्या सक्सेस पार्टीत झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवीच्या पुढील भागाची अर्थात ‘वाळवी २’ची घोषणा केली.
त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती वाळवी २’ची. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित ‘वाळवी’ची कथा, पटकथा आणि संवाददेखील त्यांचेच आहेत. तर स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे.
Discussion about this post