नाटक परिक्षण | प्रा. हरि नरके
काल बालगंधर्वला तोडी मिल फॅंटसी चा शुभारंभाचा प्रयोग बघितला. ह्या ब्रिलियंट कॉंमेडी आणि हटके म्युझिकल असलेल्या, तनमनाला प्रसन्न झिणझिण्या आणणार्या,गारूड करणार्या अनुभवातून मला अद्यापही बाहेर येता आलेलं नाहीय. आज मराठी रंगभुमीवर पाचकळ विनोदी आणि कृत्रिम मध्यवर्गीय जाणिवांच्या नाटकांची चलती आहे. मात्र खरा विनोद किती धमाल असतो, तो किती खळखळून हसवतो, हसताहसता डोळ्यातून पाणीही काढतो याचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही “तोडी मिल फॅंटसी” हे नवं नाटक बघायलाच हवं. यातलं रापचिक म्युझिक तुम्हाला भन्नाट जगात घेऊन जातं. यातली आजच्या तरूणाईची बोली आणि प्रमाण भाषेचं देखणं मिश्रण करणारी जिवंत भाषा आरपार भिडते. ही सगळीच टीम अवघ्या पंचविशीतली आहे. कलेच्या जगात आज नविन काहीच घडत नाही, सगळं कसं शिळंशिळं आणि घिसंपिटं असतं, आजकालची तरूण मुलं फारशी गंभीर नाहीत असली टिका करणारांनी तर हे नाटक आजिबात चुकवता कामा नये. आजच्या भाकड मालिकांच्या, निर्बुद्ध करमणूकीच्या आणि नटव्या बॉलीवूडच्या जगात अडकलेल्या प्रेक्षकांना इतका पॉवरफुल कंटेट व सादरीकरण आणि अस्सल अभिनय रंगभुमीवर फार क्वचितच पाहायला मिळेल.
हे नाटक जिथे घडतं ती जागा युनिक आहे. आजवर कोणत्याही सिनेमा-नाटकात या स्थळावर नाटक घडताना मी तरी बघितलेलं नाही. मुळात तिथं नाटक घडू शकतं असा विचारच एकदम भारीय. तो सादर करताना त्यातलं नाट्य कमालतर विकसित केलंय. त्यासाठी वापरलेलं नेपथ्य, लाईट्स, म्युझिक सारंच कल्पक, अस्सल नी अफलातून आहे. मुलत: आजच्या बदलत्या जगावरचं ते एक व्यंग आहे. त्यातला जळजळीत उपरोध आणि जादूई वास्तववाद काळजाला भिडणारा आहे. आजच्या पिढीचं आजचं नाटक. एकदम हटके.
आजची ही पंचविशीतली महानगरी क्रियेटिव्ह तरूणाई स्टार्टअप इंडीयाची बघत असलेली स्वप्नं, त्यांचा ओरिजिनल असा धगधगता जिवनानुभव फॅंटसीच्या अंगाने आपल्या अंगावर अक्षरश: कोसळतो. मुंबईच्या कापडगिरण्या गेल्या आणि त्या जागांवर प्रचंड मोठे टॅावर्स उभे राहिले. चाळी तोडून, झोपडपट्ट्या हटवून प्रचंड माँल्स उभे राहिले. स्काय वॉकवर झोपणारा पण टुरिझम बिझनेसची टोलेजंग स्वप्नं बघणारा नायक “घंट्या” हा जेव्हा हाय प्रोफाईल जगातल्या मॉडेलला भेटतो, तेव्हा नेमकी कोणती फॅंटसी घडते हा सस्पेन्स तसाच राहायला हवा. ती प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती सांगण्यात नाही.
या नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा प्रतिभावान मुलगा आहे. जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, या अकादमी विजेत्या कलाकृतीची आठवण करून देणारी पण कॉपी नसलेली एकदम ओरिजिनल आयडिया आणि तिचा स्वाभाविक विकास आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. विनायक प्रभात कोळवणकर हा अफाट ताकदीचा अतिशय गुणी दिग्दर्शक आहे. ब्रिलियंट. जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे आणि नागराज मंजुळे यांच्या झेप, उर्जा आणि प्रतिभेच्या जगातला. पण या कुणाचीही नक्कल न करणारा, अस्सल जीवनानुभव आपल्या चिमटीत पकडून ताकदीने मांडणारा. संपुर्ण ओरिजिनल. त्याची नाटकं प्रायोगिकतेच्या दुर्बोध चौकटीत न अडकता नवं, प्रवाही, सहज संवादी, अस्सल देणारी आणि मनाला आरपार भिडणारी. सतत नव्याच्या शोधात असलेला. संहिता, सादरीकरण, जाहीरातीपासून याची प्रत्येक गोष्ट वेगळी आणि स्वत:ची मुद्रा असलेली .
तोडी मिल फॅंटसी ची रंगमंच आपल्या खांद्यावर सहज पेलणारी कलाकार, संगितकार आणि बॅकस्टेजची टीमही एकदम तगडी आहे. झपाटलेली. काहीतरी वेगळं, भन्नाट करून दाखवणारी. या नाटकातला दणकट, कधी हळुवार तर कधी स्वप्नरंजनात रमलेला सर्व टिमचा म्युझिकल आणि अभिजात अभिनय एकदम पॉवरफुल. जब्राटच. शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,कपिल रेडेकर,सुरज कोकरे, जयदीप मराठे यांचा परफॉर्मन्स केवळ अफलातून. ही पोरं अफाट क्षमता आणि स्वत:ची झेप असलेली तगडी मुलंयत. आजउद्याची रंगभुमी आपल्या दणकट खांद्यांवर पेलण्याची अपार गुणवत्ता त्यांच्यात आहे. चैतन्य देशपांडे, अनामिका डांगरे, अगस्ती परब,प्रज्वल खेडेकर, अमेय अडिवरेकर, आशिष मंडलू यांनीही उत्तम साथ दिलीय.
नाटकात असं सगळंच रसायन जमून येणं ही फार दुर्मिळ चीज. थिएटर फ्लेमिंगो आणि भारत कला केंद्र निर्मित तोडी मिल फॅंटसी हे स्वत:चा रिदम सापडलेलं, कलदार मुद्रा उमटवणारं नाटक तुफान गाजणार. जबरदस्त चालणार असा मला विश्वास वाटतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा टीम तोडी मिल फॅंटसी.
प्रा.हरी नरके
Discussion about this post