हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डबल XL’ हा नवाकोरा धमाकेदार चित्रपट घेऊन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अतिशय जवळचा असा हा विषय जो वास्तविक रोज घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासून याबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळाली होती. यानंतर आता डबल XL या चित्रपटाचा धमाकेदार मजेशीर असा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये हुमा आणि सोनाक्षीच्या भिन्न भूमिका लक्ष वेधून घेत आहेत.
संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी अनेक महिला बॉडी शेमिंगच्या प्रकाराखाली अपमान सहन करत असतात. लोक आपापल्या सोयीने त्यांना नाव ठेवत असतात. अशा अपमानाला सामोरे जाऊन तो अपमान पचवून मोठं व्हायला जी हिंमत लागते त्या हिंमतीवरचं हा संपूर्ण चित्रपट भाष्य करतो. डबल एक्स एल या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे.
ज्याचा ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या ट्रेलरमध्ये दोन अधिक वजनाच्या तरुणी दाखवल्या आहेत. त्यांना काही करुन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठं यश संपादन करायचं आहे. मात्र त्यांचं वाढणारं वजन आणि त्यावरुन त्यांच्यावर होणारी टीका याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतोय. अशावेळी त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय, पुरुषीपणावर केलेली टीका आणि आजच्या युवकांची मानसिकता यावर केलेले उघड भाष्य अनेकांना पटताना दिसत आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच डबल एक्स एल या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. डबल एक्स एल हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनातून प्रबोधन.. अशी या चित्रपटाच्या कथानकाची मांडणी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल. चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रामानी यांनी केले आहे. तर या चित्रपटामध्ये भारतीय संघाचा प्रसिद्ध फलंदाज शिखर धवनही एका लहान मात्र महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.
Discussion about this post