हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’. या चित्रपटाच्या शीर्षकापासून, पोस्टर आणि अगदी गाण्यांचीही सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे. अनोख्या नावासह अनोखे कथानक घेऊन हा चित्रपट येत्या १५ जुलै २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. याआधी आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांच्या शिट्ट्या गुल्ल झाल्या असतील. हा चित्रपट काहीतरी अनोखा, जबरदस्त आणि हटके मनोरंजन करणारा आहे यात काहीच वाद नाही. त्यामुळे ट्रेलरही चांगलाच चर्चेत आलाय. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे चित्रपटाविषयी आधीच प्रेक्षक भारी उत्सुक आहेत.
याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या गाण्यांनी कहर केला आहे. यांनतर आता चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर चित्रपटाबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण करतोय. ट्रेलर पाहून हे सिद्धच झालंय कि चित्रपटाचं कथानक इतर कोणत्याही चित्रपटापेक्षा फार वेगळे आणि आकर्षक आहे. यामध्ये सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्त निवेदकाच्या भूमिकेत आहेत. तर व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती अव्वल आहोत हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु आहे. मग ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची धडपड, ईर्षा, द्वेष, एकाच दोन करण्याची वृत्ती सगळं काही यात अधोरेखित होत आहे. या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जाळयात कोणाचा ‘तमाशा लाईव्ह’ होतोय हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक डायलॉग्स हे धडाकेबाज आहेत. ज्यांची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. एक डिग्रीचा कागद मिळाला म्हणजे कुणी पत्रकार होत नाही.. , सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?, मुख्यमंत्री राजीनामा देतील का..? त्यांच्यात आहे का तेव्हढा दम..?, लोकांनी विचार केला असता तर टीव्ही पाहिला असता का..? फोडला असता.. या डायलॉग्सने सोशल मीडिया गाजवला आहे.
चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक संजय जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संजय जाधव म्हणाले कि, ‘यात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे, जी चित्रपटाला पुढे नेते. याचे श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला साजेसे गाणे, संगीत त्यांनी दिले आहे. लोककलेला आधुनिकतेचे स्वरूप देण्यात आलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.’
Discussion about this post