हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डिलिव्हरी बॉय’ ऐकायला, वाचायला किती साधा सोप्पा शब्द आहे. पण त्याच काम अतिशय अवघड असतं. हि व्यक्ती आपली कुणीही नसते. पण तरीही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. रोजच्या जीवनशैलीत डिलिव्हरी बॉय आपल्याला कुठे ना कुठे नाहीतर घराच्या दरवाजावर भेटतोच. घामाघूम झालेला, कधी पावसात भिजलेला हा डिलिव्हरी बॉय काय काय परिस्थितीतून जातो याचा कुणालाच अंदाज नसतो. यामुळे अनेकदा त्यांना वाईट वागणूकसुद्धा दिली जाते. तर याच ‘डिलिव्हरी बॉय’च्या जीवनावर आधारित कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट येतोय. ज्याचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आला आहे.
अभिनेता कपिल शर्माच्या ‘झ्विगाटो’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत आपली पसंती दर्शवली आहे. या चित्रपटात कपिल शर्माने ‘डिलिव्हरी बॉय’चे पात्र साकारले आहे आणि ट्रेलरमध्ये त्याची होणारी गडबड, धावपळ, मेहनत सगळं काही दाखविण्यात आले आहे. हा ट्रेलर सुरु होतो तो एका बिल्डिंगपासून. जिथे डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत असलेला कपिल शर्मा पिझ्झा घेऊन येतो. यात सुरुवातीच्याच सीनमध्ये दाखवले आहे कि, डिलिव्हरी बॉयला इमारतीतील लिफ्ट वापरण्यास मनाई आहे असे लिहिलेले दिसते. यामुळे तो जिने चढत जातो.
या ट्रेलरमध्ये डिलिव्हरी बॉयच्या विविध समस्या या सीनमधून दाखविण्यात आल्या आहेत. शिवाय ट्रेलरमध्ये या डिलिव्हरी बॉयच्या कुटुंबाची झलकदेखील दाखवण्यात आली आहे. आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या गरजांसाठी तो रात्रंदिवस पळपळ करत असतो. या ट्रेलरमधील एक सीन असा आहे जिथे या डिलिव्हरी बॉयला आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण मुश्किल होतं. ज्यामुळे त्याची पत्नी कामावर जाण्याचा निर्णय घेते आणि कुटुंबात वादविवाद सुरू होतो.
याशिवाय आणखी अनेक त्रास या डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यात तो सहन करत असतो. कित्येक अडचणी तो झेलत असतो. या सगळ्या अडचणी तुम्ही या चित्रपटात पाहू शकता आणि त्याचे आयुष्य किती कठीण आहे याचा फक्त अंदाज लावू शकता. कारण तो काय सोसतो हे फक्त त्यालाच माहित आहे. तूर्तास प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड पसंती दाखवली आहे.
Discussion about this post