हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा इतिहास अत्यंत मोठा, प्रभावी आणि जाज्वल्य आहे. ज्याच्याबद्दल बोलायचे आणि सांगायचे झाले तर आपले आयुष्य कमी पडेल. आजही छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या मनामनांत आहेत. आपण त्याची देवासमान पूजा करतो त्यांना मानतो आणि पुढील पिढीला हा वारसा देत आहोत. अशा आपल्या आराध्याला केवळ देशात नव्हे तर आता देशाबाहेरही मानवंदना देण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी अमेरिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे अनोख्या पद्धतीने शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये ‘हिंदू युवा’तर्फे तब्बल ४५ टेस्ला कार एकत्र करून त्यांचा एक भव्य असा लाइट शो करण्यात आला. यावेळी मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून हि त्यांना दिलेली अनोखी मानवंदना ठरली. या मानवंदनेसाठी दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘राजं आलं राजं आलं..’ हे गाणं वाजवण्यात आलं. हा व्हिडीओ पाहताच मराठी माणसाच्या अंगावर शहारा आला नाही तर नवलंच!! हा व्हिडीओ शेअर करत दिग्पाल लांजेकर म्हणाले कि, ‘शिवराज अष्टक मधील गाणी मनामनात.. ४५ टेस्ला कार्स आणि २४५ प्रेक्षक.. टेस्ला कार्स लाईट शो ‘हिंदू युवा‘ तर्फे USA bay area मध्ये १० जून ला आयोजित करण्यात आला होता.. मराठीतील चित्रपटांच्या गाण्यांवर आधारित हा पहिला टेस्ला शो होता. जय शिवराय..’.
लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवप्रेम अन इतिहासाचा अभ्यास सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ८ चित्रपट म्हणजे ‘शिवअष्टक’ करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे ४ चित्रपट प्रदर्शित झाले आणि गजलेसुद्धा. यामध्ये त्यांनी शिवरायांचा प्रताप अन त्यांचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. आता येत्या काळात त्यांचा ‘सुभेदार’ हे पाचवे पुष्प येऊ घातले आहे. दरम्यान दिग्पाल यांनी हा अनोख्या मानवंदनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.
Discussion about this post