हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच सर्वांचे लाडके साने गुरुजी यांनी १९३३ साली आपल्या लेखणीतून ‘श्यामची आई’ आपल्या भेटीस आणली. या लेखणीत इतकी जबरदस्त ताकद होती कि त्यांनी व्यक्त केलेली श्यामची आई सर्वानाच भावली. श्यामची आई हि एक भावना आहे. ज्याला समजली त्याला अद्भुत अनुभव मिळाला असे म्हणायला हरकत नाही. यामुळे आजच्या नव्या पिढीलाही श्यामची आई समजावी यासाठी दिग्दर्शक सुजय डहाके याने ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर आता या चित्रपटाच्या शूटिंगला कोकणातील पावस या ठिकाणी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाहून ‘श्यामची आई’चा मुहूर्त करून पुढे शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
आजकालच्या रंगीबेरंगी युगात हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. निर्मात्या अमृता अरुण राव यांच्या अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली ‘श्यामची आई’ची निर्मिती केली जात आहे. सध्या चित्रपटाचं पहिलं शूटिंग शेड्युल सुरू झालं आहे. या चित्रपटात आजवर दुर्लक्षित राहिलेले काही पैलू सादर करण्याचा ध्यास सुजयने घेतला आहे. त्यामुळे या चित्रपटात श्यामच्या टायटल रोलसाठी राज्यातील बाल कलाकारांची आॅडीशन घेऊन निवड करण्यात आली आहे. मात्र अजूनही चित्रपटातील कलाकारांची नाव सांगण्यात आलेली नाहीत. या चित्रपटात कोकण सैर होणार आहे. त्यामुळे मनाला आणि डोळ्यांना दिलासा देणारा हा चित्रपट ठरणार आहे.
या चित्रपटात ब्रिटिश राजवटीतील 1912 ते 1947 पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबतची कोणतीही माहिती सध्या तरी रिव्हील करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक सुजय डहाके याने नेहमीच इतरांहून हटके देण्याचा प्रयत्न केला आहे यात काहीच वाद नाही. ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे विविधांगी चित्रपट सुजयच्या नावे आहेत. यानंतर आता ‘श्यामची आई’ हा चित्रपट याच वाटेवरील पुढील पुष्प आहे. आपला सिनेमा सर्वांगाने रसिकांना त्या काळात म्हणजेच श्याम आणि त्याच्या आईच्या काळात घेऊन जाणारा ठरावा यासाठी सुजय आणि त्याची टिम प्रचंड मेहनत घेत आहे. यंदाचे वर्ष हे भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचे आहे. त्यामुळे हा चित्रपट दादासाहेबांना मानवंदना देणारा ठरावा अशी संपूर्ण टिमने भावना व्यक्त केली आहे.
Discussion about this post