हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवुड सिने जगतातून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या जीवाला धोका असल्याचे समजत आहे. एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र देओल आणि देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवरांची राहती घरं बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. हा फोन कॉल आल्यानंतर हि माहिती तात्काळ नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली. ज्यामुळे सर्व यंत्रणांची दाणादाण उडाली आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, या अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांना ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट करण्याची धमकी दिली होती त्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक पोहोचले असून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. याशिवाय ज्या अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याने सांगितले होते कि, २५ लोक दादरला पोहोचले असून ते हल्ल्याची योजना आखत आहेत. या फोन कॉलनंतर नागपूर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली असून या लोकांचाही शोध सुरु करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला यंत्रणा सतर्क झाल्या असून शोध मोहीम जोरावर सुरु आहे.
फिल्मी बीटच्या सूत्रानुसार, अशातच सर्व यंत्रणा सक्रिय असताना दिलेल्या धमकीनुसार कोणतेही ठोस पुरावे वा खुणा सापडत नसल्यामुळे ही खोटी धमकी आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. आतापर्यंत मुकेश अंबानीं याना अशा अनेक धमक्या येऊन गेल्या आहेत. याआधीही ऑगस्ट २०२२ मध्ये अँटिलियाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देशभरात आणि परदेशात सर्वोच्च दर्जाची Z+ सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या सुरक्षिततेसाठीदेखील शासन ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
Discussion about this post