हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील भावुक कथानकांना आपल्या अभिनयाने न्याय देणाऱ्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीचा जीवनप्रवास घेऊन लवकरच दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग एक जुनं कथानक नव्या पद्धतीने मांडणार आहेत. बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षक मायबापाचे कौतुक मिळवले. यांपैकी एक जिने चौफेर अदाकारीने ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीत केला ती अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. म्हणूनच त्यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातला आहे.
एक सुंदर आणि देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, मुखवटे, रेखाटन, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवलाय. या सौंदर्याच्या मोहिनीने स्वतःच एक पर्व निर्माण केलय. चतुरस्र अभिनेत्री ‘रंजना – अनफोल्ड’ या मराठी चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली असून या चित्रपटाची प्रस्तुती डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन – कार्निव्हल ग्रुप हे करत आहेत. कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. माहितीनुसार, लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल आणि ३ मार्च २०२३ रोजी ‘रंजना – अनफोल्ड’ रसिकांसमोर येईल.
अभिनेत्री रंजना यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांनी १९६० ते २००० पर्यंत सिनेसृष्टी गाजवली. वयाच्या पाचव्या वर्षात ‘हरिश्चंद्र तारामती’ चित्रपटातून यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. तरुणपणी ‘असला नवरा नको गं बाई’मध्ये मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘खिचडी’ अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ३ मार्च २००० साली काळाने घाला घातला आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यांनतर राहिल्या त्या आठवणी आणि त्यांची कला. म्हणूनच आज मराठी सिनेसृष्टी ‘रंजना….अनफोल्ड’ हा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाली आहे.
Discussion about this post