हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला ‘सरी’ हा चित्रपट येत्या ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचा टिझर तसेच पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पहायला मिळाली आहे. चित्रपटात प्रेमाचे एक त्रिकुट दिसत आहे. टीझरमध्ये दियाच्या (रितिका श्रोत्री) आयुष्यात आलेल्या त्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते आणि ती दोघांच्याही प्रेमात पडते. पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार..? आणि या प्रेमकथेचा शेवट नक्की काय होणार..? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या चित्रपटात अभिनेत्री रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत आणि पृथ्वी अंबर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बिंधास्त भूमिका साकारणारी रितिका एका अंतर्मुख राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारते आहे. तर अजिंक्य रोमँटिक भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर जादू करायला येतोय आणि पृथ्वी अंबर या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. सत्य, वास्तव, भास आणि आभास अशा कन्फ्यूज करणाऱ्या या गोष्टीमुळे चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिया भूमिका साकारणारी रितिका श्रोत्री म्हणते, ‘सरीमधील दियाची भूमिका साकारणे, माझ्यासाठी समाधान देणारा अनुभव होता. कारण याआधीच्या माझ्या सर्व चित्रपटांमध्ये मी बहिर्मुख भूमिका साकारल्या आहेत. ज्यात मी खूपच बिनधास्त दिसली आहे. त्या मुलींना जे वाटते, ते त्या ठामपणे व्यक्त करतात. मात्र या चित्रपटात ‘दिया’ अशी आहे, जिला खूप काही वाटते, खूप काही बोलायचे आहे, परंतु ती अंतर्मुख असल्यामुळे ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप वेगळा आणि सुंदर अनुभव आहे’.
चित्रपटात रोहितची भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत म्हणाला कि, ‘हा सिनेमा माझ्यासाठी खास आहे. कारण एकावेळी विविध माध्यमात काम करताना होणारी तारेवरची कसरत, वेळेचे व्यवस्थापन, विविध व्यक्तिरेखा साकारणे ही आव्हानं पेलण्याचा अनुभव मला घेता आला. मी दिवसा मालिकेचे शुट करून रात्री मंगलोरला जाऊन सिनेमाचे शूट करून पुन्हा मालिकेच्या सेटवर यायचो. त्यात दोन टोकाच्या भूमिका. मालिकेत संयमी तरीही रावडी तरुण साकारताना चित्रपटात मला अतिशय शांत भूमिका निभवायची होती आणि या सगळ्यात मला दिग्दर्शक अशोका यांचे सहकार्य लाभले. त्यांच्याकडून बरच काही शिकलो’.
कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन, दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले आहे. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला ‘सरी’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. पहिल्यांदाच मी मराठी कलाकारांसोबत काम करत असून या तरुण कलाकारांचा अभिनय कमाल आहे. चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल सांगायची गरजच नाही, इतके ताकदीचे ते कलाकार आहेत. ही एक प्रेमकथा आहे आणि ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल’.
Discussion about this post