हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ऐतिहासिक कथानकांवर आधारित कित्येक चित्रपट येऊ घातले आहेत. या चित्रपटांतून शिवकालीन इतिहास प्रेक्षकांसमोर साकारला जातो. “रावरंभा” हा चित्रपट देखील एक ऐतिहासिक चित्रपट आहे. मात्र याचे कथानक इतर चित्रपटांपेक्षा निराळे आहे. ‘रावरंभा’ या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘राजधानी सातारा’ जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
‘रावरंभा – द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे श्री. शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे करीत आहेत. याआधी “झाला बोभाटा”, “भिरकीट”, “बेभान”, “करंट” असे चित्रपट त्यांनी केले आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप अशोक जगदाळे करीत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चे लेखन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करण्यात येईल. मात्र अद्याप या चित्रपटातील कोणती भूमिका कोण साकारणार हे सांगितलेले नाही.
सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात दडलेली हि ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. इतिहासाच्या सोनेरी पानी लिखित ह्या प्रेमकहाणीचे रुपेरी पडद्यावर झळकणे हि बाब नक्कीच विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा निधड्या छातीचा मावळा या पोस्टरची शोभा वाढवीत आहे. आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच शिगेची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Discussion about this post