हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरलेला सिंगिंग रिऍलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांसाठी खास ठरला आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाच्या संकल्पनेला नेहमीच विशेष पसंती दिली आहे. या कार्यक्रमातील सुरांच्या शर्यतीत सहभागी झालेले वीर १५ ते ३५ वयोगटातील होते आणि या प्रत्येकाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा विविध भाषेचे विविध प्रांतातीतील कलाकार सहभागी झाले होते. मात्र अखेर या मंचाला त्याचा राजगायक मिळाला आहे.
या कार्यक्रमामधील गायकांनी आपल्या विविध शैलींमधील गाणी सादर करून प्रत्येक भाग स्पेशल बनवला. अनेक भागांमध्ये सहभागी झालेल्या विशेष अतिथींनादेखील त्यांनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला. एकूण १६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये सगळ्याच स्पर्धकांनी चांगले प्रदर्शन केले. याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला अंतिम ६ शिलेदारसुद्धा मिळाले. पण जिंकणार एकच होता. या ६ जणांमध्ये आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड हे स्पर्धक होते. यांच्यामध्ये चुरशीची सुरांची लढत झाली.
या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये गाण्याची रंगीत मैफल रंगली. दरम्यान भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या विजेत्याच नाव घोषित केले गेले. तर या राजगायक पदवीचा मानकरी ठरला उत्कर्ष वानखेडे. त्याच्या सुरांची सगळ्यांच्या मनाच्या तारा छेडल्या. विजेता उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीकडून २ लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार आणि केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर तर तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली. या स्पर्धेत संज्योती जगदाळे पहिली उपविजेती ठरली आणि तिला कलर्स मराठीकडून १ लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून २५ हजाराचा धनादेश देण्यात आला. तसेच आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली आणि तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून २५ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला.
Discussion about this post