हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट सध्या चांगलाच वादात सापडला आहे. सगळ्यात आधी तर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार असल्यामुळे वाद सुरु झाला आणि आता तर एक नवीच माहिती समोर येत आहे. ती अशी कि या चित्रपटातील त्या ७ मावळ्यांची नावे बदलण्यात आली आहेत. अशाप्रकारे इतिहासात सोयीने बदल करणे अत्यंत चुकीचे असल्यामुळे सर्वत्र या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे.
अगदी दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांना फटकारले होते. पुढील काळात ऐतिहासिक चित्रपट तयार करताना भान ठेवणे गरजेचे आहे. त्यात जर ऐतिहासिक घडामोडींची मोडतोड करण्यात आली तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत संभाजीराजेंनी त्यांना कडक इशारा दिला आहे. यातच आता नेसरी गावकऱ्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील मावळ्यांची नवे बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. नेसरी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विसाजी बल्लाळ, सिद्धी हिलाल, दिपोजी राऊतराव, विठोजी शिंदे , विठ्ठल पिलाजी अत्रे आणि कृष्णाजी हि खरी धारातीर्थी पडलेल्या वीर मावळ्यांची नावे आहेत.
#VedatMaratheVeerDaudleSaat या ऐतिहासिक चित्रपटातील स्टारकास्ट,त्यांची वेषभूषा पाहिल्यानंतर हे मावळे नसून हि तर दरोडेखोरांची गॅग वाटते.भविष्यात अश्या चित्रपटावर बंदी हवीच.स्वतःच मेंगं पोरगं लाँच करायला सगळी धडपड होती तर पेज 3 टाईप चित्रपट लाँच करून हौस भागवून घेतली पाहिजे होती.🙏 pic.twitter.com/l5WezQBg3a
— Mr.Vishvas Landge 😎 (@vishvas_landge) November 7, 2022
यामुळे कोल्हापुरामध्ये ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मावळ्यांची बदलण्यात आलेली नावे आहेत तशी चित्रपटात सामील करा. हि चूक नव्हे तर गुन्हा आहे. हे बदल त्वरित न झाल्यास आम्हाला आक्रमक व्हावं लागेल, असा इशारा नेसरीकरांनी महेश मांजरेकर यांना दिला आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी प्रतारणा केली जात असून त्याची मोडतोड होतेय. निर्माते आणि दिग्दर्शक हे मनोरंजनाच्या नावाखाली का करत आहेत हे त्यांना तरी कळतंय का…? या प्रकारामुळे चुकीचा संदेश समाजात जातोय, अशी प्रतिक्रिया नेसरीकरांनी दिली आहे. शिवाय बदल न झाल्यास आंदोलन करुन आक्रमकपणा दाखवू आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Discussion about this post