हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर मराठी आणि हिंदी नाटकांसोबत इंग्रजी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने विशेष स्थान प्राप्त केलेले ज्येष्ठ अभिनेते राजा (चंद्रकांत) बापट यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीने मनोरंजन विश्वात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने बापट यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा (गौरी), जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे. बापट यांनी हिंदुजा रुग्णालयात आपला शेवटचा श्वास घेतला आणि दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी शिवाजी पार्क विद्युत दाहिनीत त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले.
अभिनेते राजा बापट यांची कारकीर्द मोठी आणि नव्या कलाकरांना प्रेरणा देणारी आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिक्षण घेताना ते एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करत असे. इथूनच पुढे त्यांनी ललित कला साधना या संस्थेच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकात मुख्य नायकाची भूमिका साकारली. याशिवाय ‘एकटी’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी विविध ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर राजा ठाकूर यांच्या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी एक विशेष भूमिका साकारली होती.
बापट यांनी दामिनी, वहिनीसाहेब, झुंज, आम्ही दोघं राजा राणी, बंदिनी, मनस्विनी, या सुखांनो या, वादळवाट, या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्र, श्रावणबाळ रॉकस्टार यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. केवळ मराठीचं नव्हे तर ढाई अक्षर प्रेमके, चूप कोर्ट चालू है यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. आपल्या निवृत्तीनंतरही ते दादर- माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये अनेक उपक्रमांच्या आयोजनात कार्यरत राहिले आहेत. मात्र आज त्यांच्या निधनवार्तेने पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टी हळहळली आहे.
Discussion about this post