हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाट्य क्षेत्रात अत्यंत बहुमानाची आणि बहू प्रतिष्ठित समजली जाणारी ‘पुरुषोत्तम करंडक’ ही एकांकिका स्पर्धा आणि या स्पर्धेचा निकाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अशी घटना घडली आहे जी कल्पनेच्या पलीकडची आहे. सादर झालेल्या एकांकिकांपैकी एकही एकांकिका विजयी होण्याच्या पात्र नाही असे कारण देत परीक्षकांनी यंदा करंडक कोणालाही दिला जाणार नाही अशी घोषणा केली. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या निर्णयाचा विविध स्तरावर निषेध केला जात असून यावर दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनीही आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
विजू माने म्हणतात, ‘निषेध! मी ही स्पर्धा पाहिलेली नाही. त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही. परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही..? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवस – रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच ‘नाडण्याची करणी’ करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या.’
पुढे ते म्हणतात, ‘तुम्ही तरी तुमच्या शाळेत १०० पैकी १०० मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात ६५ मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत.’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून परेश मोकाशी, हिमांशु स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे लाभले होते. ही स्पर्धा १७ आणि १८ सप्टेंबर दरम्यान संपन्न झाली असून पारितोषिक वितरण समारंभ २३ सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. मात्र यंदा फक्त सांघिक पुरस्कार देणार असल्यामुळे सहभागी महाविद्यालयांपैकी कोणालाच करंडक जिंकता आला नाही. वर्षभर मेहनत घेऊन मुलांच्या पदरी निराशा आली हि दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे विविध स्तरातून या स्पर्धेचा आणि परीक्षकांच्या निर्णयाचा निषेध केला जातोय.
Discussion about this post