हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडिया आणि सर्वत्र ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट शिवसैनिक आणि ठाण्याचे नेते आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यामध्ये आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक याने मुख्य दिघेंची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता, लेखक, निर्माता आणि उत्तम दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडे यांनी केले आहे. दरम्यान एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसाद नव्हे तर विजू मानेला पाहत होतो असे म्हटले आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करीत विजू माने सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. त्यांनी भली मोठी पोस्ट शेअर करीत काही खास गोष्टी नमूद केल्या आहेत आणि सोबत तरडे तुम्हाला मराठी प्रेक्षकांनी माफ केलं नसतं अशी म्हटलंय. तेव्हा दिघेंच्या भूमिकेसाठी जेव्हा विजू मानेंनी नकार दिला तेव्हा कुठे जाऊन आता ‘धर्मवीर’ इतिहास रचतोय.
विजू माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कि. प्रवीण विठ्ठल तरडे …मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं…… मराठी चित्रपटसृष्टीतील एक माईलस्टोन ठरलेला ‘धर्मवीर’ चित्रपट. मी ‘पांडू’ सिनेमा चित्रित करत असताना माझ्या कानावर आलं की प्रवीण तरडे ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट करतोय. सिनेमाचं शूट संपल्यावर पांडूचं प्रमोशन सुरू झालं आणि प्रवीण म्हणाला विजू धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका करशील का ? कारण तू त्यांना जवळून पाहिले आहेस. त्यांचा सहवास बराच तुला लाभला आहे. तुला त्यांची प्रत्येक वृत्ती, देहबोली, नजर, लकबी माहिती आहे. मी हसलो. मला वाटलं प्रवीण माझी मस्करी करतोय. प्रवीणला मी म्हणालो, तुला जी हवी ती मदत मी करेन त्यासाठी असं काही बोलायची गरज नाही. तो विषय टाळून आम्ही पुढे गेलो. पण प्रवीणने पुन्हा एकदा प्रमोशनच्या निमित्ताने भेटलो असता विषय काढला अरे विजू तुझी ऑडिशन कधी देतोयस? मी म्हटलं कसली ? तर म्हणाला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रोलची. अरे वेडा आहेस का ???? त्या व्यक्तीचं चरित्र साकारणं? तेवढा बरा अभिनेता मी नाही. आणि जे मला जमणार नाही ते मी कधीच करणार नाही. माझ्या नकाराबद्दल तुला जरी वाईट वाटलं तरी हा निर्णय मी ठामपणे घेतलेला आहे. तुही असा विचार करू नकोस, खूप चांगले अभिनेते मराठी चित्रपट सृष्टीत आहेत. आणि त्याला प्रसाद ओक दिसला….इतिहास घडला.
‘धर्मवीर’ सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी जर प्रवीण तरडेला होकार कळवला असता, तर त्या सिनेमाचं काय होऊ शकलं असतं. इतका अप्रतिम सिनेमा झालाय. प्रसादच्या अभिनयानं तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ‘धर्मवीर’ या सिनेमापासून मराठी चित्रपटसृष्टीत *प्रसादपर्व* सुरू होणार आहे. प्रसाद माझा लाडका अभिनेता आहेच, चांगला मित्र आहे. शिवाय माझ्या ‘ती रात्र’, ‘खेळ मांडला’, ‘शिकारी’ अशा सिनेमांमध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे. मला नेहमी असं वाटायचं की मराठी चित्रपटसृष्टीत दोन अभिनेते असे आहेत ज्यांना त्यांच्या क्षमता सिद्ध करणारं काम मिळालेलं नाही. यातील एक अभिजित चव्हाण आणि दुसरा म्हणजे प्रसाद ओक . ‘धर्मवीर’ सिनेमा पाहताना अभिनयाने ‘पडदा व्यापून टाकला’ म्हणजे काय हे कळतं. प्रसाद प्रसाद आणि प्रसाद… मला तर अनेकदा शंका यायची प्रसादच्या अंगात प्रत्यक्ष दिघेसाहेब यायचे की काय.
मी एकदा सहज सेटवरही गेलो होतो. तिचे प्रसाद माझ्याशी गप्पा मारत होता. अचानक टेक सुरू झाला. प्रसादने डोळे बंद केले. आणि कॅमेरा साठी डोळे उघडले. ते मला प्रसादचे वाटलेच नाहीत. ते धर्मवीरांचे होते. परकाया प्रवेश खरा आहे की नाही हे माहीत नाही. पण त्यासदृश अनुभूती प्रसादने या सिनेमात नक्की दाखवलीय. मंगेश देसाई यांनी उच्च निर्मितीमूल्य जपणं किती जिकिरीनं केले असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि प्रवीण तरडे यांनी आपली लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनची आजवरची कारकीर्द वरच्या टप्प्याला नेलीय… हे तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेलच. जे 10000% खरंय. विद्याधर भट्टे यांचंही मोलाचं योगदान आहे. सिनेमा संपताना माझे डोळे पाणावले होते. मी उठून थेट धावत जाऊन आधी चेहरा धुतला. शब्दात कौतुक न करता आल्यामुळे प्रसादला घट्ट मिठी मारली. ज्यांनी सिनेमा पाहिला ते कौतुक करतच आहेत. पण ज्यांनी पाहिला नाही त्यांना सांगेन ओटीटी वर “वाट” पाहण्यासारखा हा सिनेमा नाही. थिएटरमध्ये “थाट” पाहण्यासारखा हाच सिनेमा आहे… धर्मवीर विजय असो.
Discussion about this post