हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्री हादरवून टाकणारा ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट आणि एक नवे वास्तव समोर आणण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी संकेत दिलेल्या या आगामी चित्रपटाच्या प्रतीक्षेत सगळेच होते. यानंतर अखेर आज या चित्रपटाबाबत घोषणा करण्यात आली आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘द वॅक्सिन वॉर’ असे आहे आणि हा चित्रपट येत्या वर्षातील स्वातंत्र्य दिन अर्थात १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आपल्या सर्वांच्या अत्यंत जवळच्या आणि भयावह परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी करणार आहेत. तर निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ हिंदीत नव्हे तर इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा ११ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित हा चित्रपट काय परिणाम घेऊन येणार हे येणारी वेळ सांगेल.
या चित्रपटाविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले कि, ‘लॉकडाऊन दरम्यान जेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ पुढे ढकलण्यात आला, तेव्हा मी यावर अभ्यास सुरू केला. मग आम्ही ICMR आणि NIV च्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आपली स्वदेशी लस तयार केली. त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती आणि संशोधन करताना आम्हाला समजले की हे शास्त्रज्ञ भारतासाठी केवळ परदेशी एजन्सीच नव्हे तर आपल्याच लोकांशी कसे लढले. तरीही, आपण सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस तयार करून महासत्ता देशांवरही विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावीशी वाटली. एका बायो-वॉरबद्दल भारतातील हा पहिला विज्ञान चित्रपट असेल.’
Discussion about this post