हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या पारंपारिक लग्न सोहळ्याच्या सिरीजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. गेल्या गुरुवारी, ११ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता हि ३ भागांची विशेष वेडिंग स्टोरी सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाली. यानंतर आता या सीरिजला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे.
या सीरिजचे शीर्षक गीत ‘तुला मी.. मला तू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. तर कुणाल भाओजींचा मराठमोळा अंदाज आणि पुष्पा स्टाईल उखाणा तर जबरदस्त हिट झाला आहे.
सोनालीचं लग्न एखाद्या स्वप्नासारखं वाटत आहे. सगळीकडे लगीनसराईची गडबड, पाहुणे मंडळी, रंगबेरंगी फुलांच्या माळा, भरजरी साड्या, मोलाच्या पैठण्या, सनई चौघडे, वरात घोडा आणि राजबिंडा नवरदेव नटलेल्या नवरीला घ्यायला आला.
हे सगळं कसं भारी आहे. यातच आपल्या लग्नाचा साज शृंगार हा प्रत्येक मुलींसाठी खास असतो. तर यावेळी सोनालीचा प्रत्येक लुक तिच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला आणखीच आनंदी करतो. प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झालेल्या या वेडिंग स्टोरीत अगदी ग्रहमख, मेहंदी, संगीत, हळद, वरात, लग्न आणि गृहप्रवेश अशा प्रत्येक पारंपरिक रीती पहायला मिळत आहेत.
दरम्यान शेवटी गृहप्रवेश करताना सगळे राहिले बाजूला आणि सोनालीनेच उखाण्याचा आग्रह धरला. म्हणे कि, कुणालने उखाणा घेतला तरच मी घरात येईन. आता उखाणा घ्यायचा म्हणजे यमक जुळवायचं आणि अर्थपूर्ण बोलायचं. बापरे.. केव्हढी ती कसरत! पण कुणाल भाऊजी काही हटले नाहीत. शेवटी त्यांनी भारीपैकी उखाणा घेतलाच आणि उखाण्यात सोनालीची फिरकीसुद्धा घेतली.
त्यांनी उखाणा घेत म्हटलं कि, ‘लग्न झालं दणक्यात.. लग्नात होता बोलबाला.. सोनालीचं नाव घेतो ‘मैं झुकेगा नहीं साला’. यावर सगळ्यांचा हशा पिकला. अगदी सोनालीसुद्धा खळखळून हसली. सोनाली आणि कुणाल लग्नानंतर फारच आनंदी आहेत आणि हा आनंद नेहमीच सोनालीच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तर सोनाली आणि कुणालसाठी एव्हढंच म्हणू कि, नांदा सौख्य भरे!
Discussion about this post