हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अशोक सराफ हे केवळ नाव नाही तर चित्रपटसृष्टीतील एक पर्व आहे. ज्याने अनेकांना आपल्या अभिनयातून हसवलं, रडवलं, खलनायक होऊन कधी घाबरवलं तर माया देऊन कधी सावरलं. मराठी काय आणि हिंदी काय.. विविध भाषांमध्ये आणि विविध प्लॅटफॉर्मवर अशोक मामांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं. अशा या हरहुन्नरी कलाकाराची पंच्याहत्तरी अलीकडेच संपूर्ण सिनेसृष्टीने जल्लोषात साजरी केली. वयाचा इतका काळ लोटून गेला पण अशोक मामा आजही तितकेच फिट, फाईन आणि कलेच्या बाबतीत उजवे आहेत. यानंतर आता त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त नुकताच ठाणे येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी मामांनी चक्क तबल्यावर हात साफ केले. त्यांची कला पाहून सारेच थक्क झाले आणि विचारू लागले तुम्ही तबला वादनाचे शिक्षण कधी घेतले. याबाबत सांगताना मामांनी भन्नाट किस्सा सांगितला आहे.
अशोक मामांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आपण अशोक मामांना ताल आणि सूर धरीत तबल्याला अभिवादन करताना पाहू शकतो. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा, ग्रंथाली प्रकाशन मुंबई, स्वा वि. दा. सावरकर प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशोक सराफ लिखित ‘मी बहुरुपी’ ह्या पुस्तकावर मुलाखती दरम्यान विघ्नेश जोशी पेटीवर आणि अशोक सराफ तबल्यावर. अशोक मामा यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण होताच त्यांचे ‘मी बहुरुपी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यानिमित्त ठाणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हाच हा व्हिडीओ आहे.
यावेळी, तुम्ही तबला वादनाचे शिक्षण कधी घेतले..? या प्रश्नाचे अतिशय मजेशीर किस्सा सांगत मामांनी उत्तर दिले आहे. यावर बोलताना अशोक मामा म्हणाले, ‘मला कोणीही तबला वाजवायला शिकवले नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही. मला यातलं फारस काही कळत नाही. हा तबला कसा वाजवायचा मला कोणीच शिकवलेले नाही. पण मी वयाच्या जवळपास चार ते पाच वर्षांपासून तबला वाजवतोय. तबला वाजवताना बोटांचा वापर कसा करायचा याचा मला काहीही अंदाज नाही. पण मला जमतं. मी शास्त्रीय तबला शिकलेलो नाही. एकदा मला माझ्या मामांनी पंडित यशवंत बुवा केतकर यांच्याकडे तबला वादन शिकण्यासाठी पाठवले होते. मी एक दिवस गेलो. त्यांनी तबला वाजवण्याचे प्रशिक्षण दिले. अगदी बोटांचा वापर कसा करायचा हेही शिकवलं. पण मला ते आधीपासून जमत होतं. मी त्यांना एकदा तबला वादन करुन दाखवलं, तेव्हा ते म्हणाले अरे तुला येतंय. मी पुन्हा त्यांना विचारलं हे एवढंच आहे. त्यावर ते म्हणाले हो हे एवढंच आहे. तेव्हा मी म्हणालो अरे हे तर मला येतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांच्याकडे गेलोच नाही,’ असा मजेशीर किस्सा ऐकून श्रोते मंडळी देखील खळखळून हसले.
Discussion about this post