हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या दरम्यान मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरफीच्या तुकड्या अद्यापही अथक परिश्रम घेत आहेत. असे असताना पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात द्यावा म्हणून अनेकांनी आवाहन केले आहे. यात आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदकडे बोट दाखवत, कोरोना काळात जन्मलेला मसीहा कुठेय..? असा खोचक सवाल केला आहे.
कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?#KonkanFlood #SonuSood #WhereIsMashiha @SonuSood @mnsadhikrut pic.twitter.com/ucTAknzQ3c
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 3, 2021
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?’ असा सवाल शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदला विचारला आहे. देशावर आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि गरजूंना मदत करणारा सोनू सुद आज कोकणच्या पूरपरिस्थितीत मदत करतांना दिसत नसल्यामुळे शालिनी ठाकरे यांनी हि बोचणारी टीका केली आहे.
कोकणातील पूरपरिस्थिती पाहिल्यानंतर अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड जगतातील दिग्गज कलाकारांची कानउघाडणी केली होती. इतकी भीषण परिस्थिती असताना बॉलिवूड जगतातील दिग्गज कलाकारांना साधं ट्विटही करावं वाटलं नाही असे ते म्हणाले होते. यानंतर आता याच मुद्यावरून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सोनू सूदवर निशाणा साधला आहे. मात्र देशावर ओढवलेल्या महामारीच्या संकटात सोनू सूदने सढळहस्ते केलेल्या मदतीमुळे आज कित्येक लोक त्याची देवासारखी पूजा करतात. शिवाय गतवर्षापासून आतापर्यंत सोनू सूदचे मदतकार्य सुरुच आहे. त्यामुळे असे असताना शालिनी ठाकरे यांनी केलेली हि टीका सामान्य नागरिक किती मनावर घेईल असा एक प्रश्न उपस्थित राहत आहे.
Discussion about this post