हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होऊन सिनेमागृह दणाणून सोडणारा चित्रपट म्हणजेच ‘द काश्मीर फाईल्स’ . हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. १९९० साली काश्मीरमध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून केलेल्या स्थलांतराची हि गोष्ट आहे. हि केवळ कथा नव्हे तर काश्मिरी पंडितांची व्यथा आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांसारख्या तगड्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. दरम्यान चित्रपटात गाणी का नाहीत असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचे कारण स्पष्ट केले आहे.
एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले कि, ‘द काश्मीर फाईल्समध्ये गाणी नाहीत. याचे कारण म्हणजे या चित्रपटात एक अत्यंत दु:खद घटना दाखवण्यात आली आहे. त्याचसोबत हा चित्रपट म्हणजे नरसंहाराला बळी पडलेल्या पीडितांना श्रद्धांजली आहे. तरीही मी एका काश्मिरी गायकाने गायलेलं एक लोकगीत रेकॉर्ड केलं होतं. शिवाय ते गाणं लतादीदींनी गावं अशी आमची इच्छा होती.
एव्हाना लतादीदींनी चित्रपटांसाठी गाणं बंद केलं होतं आणि निवृत्ती घेतली होती. पण आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यांची पल्लवीशी जवळीक होती आणि त्यामुळेच त्यांनी आमच्या चित्रपटासाठी गाण्यास मान्यदेखील केलं होत.”
पुढे म्हणाले, “काश्मीरवर लतादीदींना खूप जिव्हाळा होता. कोविडची लाट कमी झाल्यानंतर गाणं रेकॉर्ड करू, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांना स्टुडिओमध्ये जाण्याची परवानगीदेखील नव्हती. म्हणून आम्ही फक्त त्यांच्यासोबत रेकॉर्ड करण्याची वाट पाहत होतो. मात्र हे गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वीच त्यांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला आणि संगीत सृष्टी पोरकी झाली. त्यांच्यासोबत काम करणं हे पाहिलेलं एक स्वप्न कायमचं स्वप्नच राहिलं,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Discussion about this post