हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसात ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाला इतके ट्रोल केले गेले कि दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आता चित्रपटाच्या भविष्याची चिंता होऊ लागली आहे. अलीकडेच या चित्रपटावरील चालू वाद इतका विकोपाला पोहोचला कि हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात सादर केली गेली. यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात आले आहे. या चित्रपटातील श्री रामांच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसतो आहे. टीझरमधील त्यांच्या भूमिका पाहून प्रेक्षक वर्ग चांगलाच संतापला. यानंतर चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटविण्याबाबतही सोशल मिडीयावर बोलले गेले. यावर अखेर दिग्दर्शक ओम राऊत यांनी मौन सोडले आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटावरून सुरु असलेला वाद थांबत नाही हे पाहून एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले कि, ‘काहीही झालं तरी प्रेक्षक आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे कृपया आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला कोणत्याही दृष्टीने नाराज करणार नाही. गेल्या काही दिवसात आमच्याकडे प्रेक्षकांकडून ज्या ज्या सुचना आल्या आहेत, आम्ही त्यावर बारकाईने विचार करणार आहोत. हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ रोजी जेव्हा सर्वत्र प्रदर्शित होईल, तेव्हा आम्ही कुणालाही निराश केलेलं नसेल याची आम्ही काळजी घेऊ. आम्ही थोडा वेळ घेऊन योग्य तो विचार करून पुढील पाऊले उचलण्यास सज्ज आहोत.’
‘आदिपुरुष’मधील पात्रांवरुन होणारा वाद पाहता या चित्रपटामध्ये काही बदल करणार का..? असा प्रश्न माध्यमांकडून ओम राऊत याना विचारण्यात आला असता ते म्हणाले कि, ‘आम्ही आता फक्त ९५ सेकंदाचा टीझर तयार केला आहे. त्यावरुन मोठा वाद सुरु झालाय. मी परत एकदा सांगतो कि, चाहते, प्रेक्षक यांच्या ज्या भावना आहेत त्यांचा आम्ही पूर्णपणे आदर करतो आणि म्हणून त्याचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यांना मी कदापि निराश करणार नाही.’
Discussion about this post