हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| श्री स्वामी समर्थ या नामात आयुष्यभराचं सारं दडलं आहे. त्यामुळे स्वामींच्या भक्तीची ओढ लागणे अत्यंत स्वाभाविक. मराठी सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने नाव कमावलेले दिग्दर्शक केदार शिंदे सुद्धा स्वामींचे मोठे भक्त आहेत. सध्या केदार आपल्या आजोबांच्या अर्थात शाहीर साबळे यांच्या जीवनपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटाची निर्मिती हे फार मोठं शिवधनुष्य आहे. ज्याची जबाबदारी केदार शिंदेंनी खांद्यावर घेतली आहे. हा चित्रपट एक आव्हान आहे आणि याला सामोरे जाण्यासाठी स्वामींच्या पाठबळाची आवश्यकता आहे. म्हणूनच केदार शिंदे यांनी दादरमधील स्वामी मठात चित्रपटाच्या संहितेचे पूजन केले. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली आहे.
मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदे यांनी स्वामींचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘# महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या संहितेची पुजा ‘श्री स्वामी समर्थ महाराज मठ, दादर’ येथे केली. आपण कष्ट करतो. त्याला साथ तुम्ही रसिक प्रेक्षक गर्दी करून देता पण, महत्वाचा आशिर्वाद हा त्या शक्तीचा असतो, जी शक्ती बुद्धी शक्ती देते. माझी नितांत श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर आहे. त्यांच्या आज्ञेने आणि इच्छेनेच मी कार्य करू शकतोय…. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे आपले आजोबा शाहीर साबळे यांचा लोककलेचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी नेहमीच धडपडत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती सिनेसृष्टीला तसेच रंगभूमीला दिल्या आहेत. यानंतर आता कोळी गीते, भावगीते, पोवाडे, गवळण अशा लोककला ज्यांनी जपल्या त्या शाहीर साबळे आणि अन्य लोक कलावंतांच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट ते घेऊन येत आहेत.
या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी आपल्याला दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रीलिजनंतर अंकुश चौधरी ही भूमिका साकारत असल्याचे समोर आले आणि त्याच्या चाहत्यांनाही एक वेगळं सरप्राइज मिळालं.
Discussion about this post