हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल मनोरंजन विश्वात एक झालं कि काहीतरी दुसरं मोठं असं प्रकरण घडतच आहे. या प्रकरणांमध्ये विशेष करून बॉलिवूडमधील कलाकार प्रचंड वादात सापडल्याचे दिसत आहे. तसेही बॉलिवूडमधील अनेक कलाकार सतत ह्या ना त्या गोष्टीमुळे वादात अडकल्याचे दिसतेच. या कलाकारांची यादी मोठी आहे. तर या यादीत आता बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाची देखील गणती केली जाईल. कारण एका लेखिकेने त्याच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या लेखिकेचे नाव प्रियंका शर्मा असून हि एक स्क्रिप्ट रायटर आहे. रणदीप हुडा आणि त्याच्या टीमने आपली फसवणूक केली आहे असा आरोप प्रियंकाने केला आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणी तिने हरियाणा पोलिसांत रणदीपविरुद्ध तक्रारसुद्धा दाखल केली आहे.
लेखिका प्रियंकाने तक्रार केल्यानंतर हरियाणा पोलिसांकडून रणदीपला नोटीस बजावण्यात आली आहे. हिसार अधिवक्ता रजत किसान यांनी याविषयी माहिती दिली आहे. माहितीनुसार प्रियंका सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रणदीपच्या संपर्कात आहे. दरम्यान तिने सोशल मीडियाचा वापर करून अनेक गाणी आणि कथा रणदीपसोबत शेअर केल्या आहेत. यावर रणदीपने लवकरच आपण यावर एकत्र काम सुरु करु, असे आश्वासन प्रियंकाला दिले होते, अशी माहिती प्रियंकाने दिली आहे.
प्रियंकाने दिलेल्या माहितीनुसार, रणदीपसह त्याच्या टीमला आत्तापर्यंत १२०० गाणी आणि ४० कथा तिने दिल्या आहेत. पण यानंतर बरीच वर्षे लोटून गेली आहेत आणि तरीही रणदीपने यावर काम सुरु केलं नाही म्हणून प्रियंकाने स्क्रिप्ट माघारी पाठवण्यास सांगितले. यानंतर रणदीपने तिला जिवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तिने केला आहे. याप्रकरणी रणदीपने १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रियंकाने केली आहे. प्रियंकाने सांगितल्याप्रमाणे, ८ वर्षांपासून तिची फसवणूक होत आहे. ती सतत रणदीपकडे यावर उत्तर मागत होती. मात्र, तो काहीही बोलत नव्हता. आता नेमके खरे काय खोटे काय यावर एक प्रश्न चिन्ह कायम आहे. कारण, याप्रकरणी रणदीपने अद्याप काहिही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय हरियाणा पोलिसांच्या नोटीसवरही तो निरुत्तर राहिला. त्यामुळे आता सर्व लक्ष रणदीपच्या प्रत्युत्तरावर लागलेले आहे.
Discussion about this post