Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्याच्या निधनानंतर ११ दिवस उलटले, पण चाहते आजही स्मशानाबाहेर लावतायत रांगा; पहा हा भावुक व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे आकस्मिक निधन अक्षरशः चटका लावणारे होते. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अद्यापही हा धक्क्या पचवू शकलेले नाहीत. आज पुनीथ यांच्या निधनाला ११ दिवस पूर्ण झाले आहेत. यानंतर आज स्मशानाबाहेर लांबच लांब चाहत्यांच्या रांगा लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतेय की, दिवंगत पुनीथ राजकुमार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहते रांगेत उभे होते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर भावूक चाहत्यांनी पुनीथ राजकुमार यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली आणि आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ ला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी चाहत्यांचा आणि संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीला चांगलेच नुकसान झाले. पुनीथ यांच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेल्या १० चाहत्यांच्या मृत्यूची प्रकरणे आतापर्यंत कर्नाटकात समोर आली आहेत. यात काही आत्महत्येची प्रकरणेही आहेत. तर ३ चाहत्यांनी पुनीथसारखे मृत्यू पश्चात नेत्रदान करता यावे म्हणून आत्महत्या केली. पुनीथ गेल्यानंतर अचानक कर्नाटकात नेत्रदानाचा आकडा वाढला असल्याचे दिसून येत आहे.

पुनीथ राजकुमार हे १७ मार्च १९७५ रोजी जन्मले आणि त्यांना अप्पू म्हणून ओळखले जायचे. त्यांनी २९ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते; लहानपणी ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले. यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. संतोष आनंदद्रम दिग्दर्शित आणि विजय किरगंदूर निर्मित होंबळे फिल्म्स या बॅनरखाली बनलेल्या युवारथनामध्ये शेवटचे पुनीथ दिसले होते. सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली देत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.