Take a fresh look at your lifestyle.

’83’ भारतीयांच्या क्रिकेट वेडाच्या प्रवासाची सुरुवात दाखवणारा चित्रपट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीयांना राजकारण, क्रिकेट आणि चित्रपटाचं प्रचंड वेड आहे. लोकांना एकत्र आणण्यासाठी या माध्यमांचा वापर बऱ्याचदा झाल्याचंही पहायला मिळतं. 83 चित्रपटाची कहाणीसुद्धा अशीच. लोकांना एकत्र आणणारी. त्यांना देशप्रेमासोबतच क्रिकेट जगायला शिकवणारी. 83 हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून या चित्रपटाचं कथानक भारताच्या विश्वचषक विजयाचा प्रवास दाखवणारं आहे. संपूर्ण चित्रपट हा भारताचे विश्वचषकातील सामने आणि टीम स्पिरीट यावर आधारलेला आहे. १९७५ पासून सुरू झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्या २ स्पर्धांत भारतीय संघाची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. १९८३ ला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कपिल देवकडे देण्यात आली.

कपिल देवच्या कर्णधारपदाचं वेगळेपण अनुभवण्यासाठी हा चित्रपट पहायलाच हवा. या चित्रपटाचं वेगळेपण म्हणाल तर संघातील प्रत्येक खेळाडूला देण्यात आलेलं महत्त्व. १९९० नंतर जन्मलेल्या पिढीला १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सर्वच खेळाडूंची नावं क्वचितच माहित असतात. फारफार तर कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री ही नावं लक्षात ठेवली जातात कारण हेच खेळाडू पुढे समालोचक म्हणूनही लोकांच्या डोळ्यासमोर येत राहिले. 83 चित्रपट कुठल्याही खेळाडूला अवास्तव महत्त्व न देता आहे ती वस्तुस्थिती आणि खेळाडूंची कामगिरी दाखवतो.

कृष्णाम्माचारी श्रीकांत, मदन लाल, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद, यशपाल शर्मा, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, सुनील वेल्सन, सईद किरमानी या खेळाडूंची नव्याने ओळख या चित्रपटातून होते. या भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. देशप्रेमासंदर्भात कोणताही चित्रपट असला की देशातील सामाजिक- राजकीय वातावरण, इतर देशातील लोक आपल्यासंदर्भात काय विचार करतात हे प्रामुख्याने दाखवलं जातं. 83 चित्रपटही त्याला अपवाद नाही. ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतर ३५-४० वर्षांनंतरही त्या देशातील लोक आपल्याबद्दल काय विचार करत होते हे या चित्रपटातून पहायला मिळतं.

बाकी रणवीर सिंगने साकारलेली कपिल देवची भूमिका भाव खाऊन गेली आहे. हरियाणा हरिकेन या नावाने ओळखला जाणारा कपिल देव चित्रपटात ‘सेन्सिबल यंग कॅप्टन’ म्हणून समोर आला आहे. कपिल देव किंवा इतर खेळाडूंची कुठलीही अवास्तव प्रतिमा न दाखवणं हे य चित्रपटाचं यश आहे. संघभावना जपत, सगळे निष्कर्ष चुकीचे ठरवत भारतीय खेळाडूंनी मिळवलेला दिमाखदार विश्वविजय केवळ पावणेदोन तासांत अनुभवायला मिळणं ही भारी गोष्ट आहे. याशिवाय प्रत्यक्ष सामना पाहत असल्याची फीलिंग हा चित्रपट देतो. वेस्ट इंडिज आणि भारतीय संघातील खेळाडूंची हुबेहूब चेहरेपट्टी दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटात दाखवली आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाजी तोफखाना आणि फलंदाजी स्वॅग या चित्रपटात अंगावर काटा आणतो. चित्रपट 3D मध्ये पाहत असाल तर आणखीनच मजा येणारे. बाकी चित्रपटातील गाणीही खास आहेत. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पादुकोनच्या वाट्याला आलेले २ प्रसंगही तिने मस्त साकारलेत.

२०११ साली महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचून भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक मिळवून दिला होता. त्यावेळी “Dhoni finishes it off in style, a magnificent strike into the crowd, India lift the World Cup after 28 years, the party starts in the dressing room, and it is an Indian captain who has been absolutely magnificent on the night of finals.” या ओळी समालोचक रवी शास्त्री यांच्या तोंडून संपूर्ण जगभराने ऐकल्या. आठवणीतही जपून ठेवल्या. अगदी त्याच धर्तीवर 83 चित्रपट २८ वर्षांपूर्वीच्या आठवणी उजळवण्यासाठी पहायलाच हवा. क्रिकेटप्रेमींनी तर ही मेजवानी अजिबात सोडू नका.