हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठताना दिसतेय. त्यामुळे आता रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले आहेत. तसेच ऑक्सिजन सिलेंडर, औषधे, इंजेक्शन या साऱ्यांचीच कमतरता अनेक रुग्णालयात भासत आहे. याचा प्रत्यय प्रसिद्ध गायक बाबा सेहगल याना जवळून आला आहे. वेळेत बेड न मिळाल्यामुळे त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. मात्र वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, म्हणत बाबाने खंत व्यक्त केली आहे.
बाबा सेहगल यांचे वडील जसपालसिंह सेहगल यांचे सोमवारी कोरोनाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. बाबा सेहगल यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले की, माझे वडील माझी बहीण आणि तिच्या पतीसोबत लखनऊमधील गोमतीनगर परिसरात राहात होते. त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते आठ दिवसांपासून होम क्वांरंटाईन होते. त्यांची तब्येत सुधारत देखील होती. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांची ऑक्सिजन पातळी प्रचंड कमी झाली होती.
पुढे म्हणाले, ‘त्यांची तब्येत खराब झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. पण रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नव्हती. अनेक प्रयत्नानंतर आम्हाला रुग्णवाहिका मिळाली. पण रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता. तसेच ऑक्सिजन सिलेंडर देखील उपलब्ध नव्हते. माझ्या वडिलांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. योग्य वेळी उपचार न मिळाल्याची खंत बाबा सेहगल यांनी व्यक्त केली आहे. सध्या बाबा सेहगल हैद्राबादमध्ये असून वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याने त्याला वडिलांचे अंतिमदर्शन देखील घेता आले नाही.
Discussion about this post