हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच कॉमेडियन सुगंधा मिश्रा व डॉ. प्लस कॉमेडियन असलेल्या संकेत भोसले यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली आहे. २६ एप्रिल रोजी पंजाबमधील फगवाडा येथे क्लब कबाना रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी आलेल्या सर्व पाहुण्यांना २४ तासांसाठी क्वारंटाइन केले होते. एवढेच नव्हे तर या लग्नात उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना लग्नस्थळी जाण्यापूर्वी अँटीजन टेस्ट करावी लागली होती. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडल्याचे बोलले गेले.
लग्नादरम्यान कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामुळे हे नवविवाहित दाम्पत्य आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सुगंधा मिश्रा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्या गोष्टी तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केल्या होत्या. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले. त्यांच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षावही केला. मात्र हे सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे सुगंधाला चांगलेच महागात पडले आहे. यामूळे लग्नाचा आहेर म्हणूनच कि काय तिच्यावर एफ आय आर दाखल झाली आहे.
सुगंधा आणि संकेतच्या लग्नात नियमापेक्षा अधिक लोक जमले असल्याचा तिच्यावर आरोप आहे. कोरोना लॉकडाऊनच्या नियमांनुसार लग्नसमारंभासाठी केवळ २५ लोकांची उपस्थती आणि दोन तासात लग्न उरकावे लागणार असा नियम होता. मात्र या लग्नात १०० लोकांची उपस्थिती असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. सुगंधाच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. सुगंधासोबत ज्या हॉटेमध्ये हे लग्न पार पडले त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनही या लग्नामुळे चांगलेच अडचणीत आले आहे.
Discussion about this post