हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले आणि यानंतर असा काही वाद उफाळला कि बस. गांधींना मारल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असे ते म्हणाले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेता डॉ. अमोल कोल्हे हे मोठ्या पडद्यावर त्याच नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे चाहत्यांनी आनंदी व्हायचं का कष्टी असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या चित्रपटाचे नाव असून, तो येत्या ३० जानेवारी २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी संबंधित भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देत आपण गांधीजींच्या हत्येचे समर्थन करीत नाही करणार नाही असे सांगितले आहे.
https://www.youtube.com/watch?v=ygfbYwAr0AU
याबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी माध्यमांना सांगितले कि, २०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो किंवा कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे, मी एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी शंभर टक्के जोडले गेलेलो असतो असे नाही. मी सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या कृतीचे उदात्तीकरण करीत नाही. ‘गांधीजींच्या हत्येचं मी समर्थन करीत नाही.. करणार नाही’ त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन भिन्न गोष्टी आहे. इतकेच मला वाटते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही.’ तर ट्विट करताना लिहिले कि, डॉ.अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.
Discussion about this post