हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची आवडती सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचा अतिशय प्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रासह जगभरातील अनेक प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. या कार्यक्रमाचे इतके चाहते आहेत कि प्रत्येक नव्या भागात काय दाखवणार कोणता कलाकार हास्याचे पटाखे फोडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही आतुर झालेले असतात. यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे तब्बल ५०० भाग पूर्ण झाले आहेत. यानंतर कार्यक्रमाची लोकप्रियता पाहता हा कार्यक्रम आठवड्यातून सलग ५ दिवस प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचे निर्मात्यांनी योजले आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २५ एप्रिल २०२२ पासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. संबंधित आनंदाची बातमी देण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्क्रमाचे विविध प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आणि त्यानंतर बघता बघता ५०० एपिसोड्सचा टप्पा पार पाडला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. त्यामुळे एकही कलाकार असा राहिलेला नाही जो प्रेक्षकांचा लाडका नाही.
यामुळे आता आठवड्यातून ५ दिवस हे लाडके कलाकार हसवायला येणार म्हटल्यावर प्रेक्षकसुद्धा आनंदी आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर अनेक हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी खळखळून हसविण्याचा पवित्रा घेतला आहे. अगदी लॉकडाऊनच्या काळातही या काळकरांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यामुळे आता आठवड्यातले पाच दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हि बातमीच अत्यंत आल्हाददायी आहे.
Discussion about this post