Take a fresh look at your lifestyle.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ टीम ठरली ‘माझा पुरस्कारा’ची मानकरी; मुख्यमंत्र्यांनी केले भरभरून कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण काळातही प्रेक्षकांना निखळ हसवून नैराश्यास दूर करून जगण्याची आशा देणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी रिऍलिटी शो अत्यंत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण टीम नेहमीच प्रेक्षकांचे अगदी मनापासून निखळ आणि शुद्ध मनोरंजन करीत असते. या संपूर्ण टीमला यंदाचा ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा माझा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलाकारांना आणि पडद्यामागील किमयागारांना देण्यात आलेला आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कारा’चे हे १२वे वर्ष होते आणि यंदा या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधील कलाकारांची निवड करण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी या कलाकारांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार देतेवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीमचे कौतुक केले. “यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक – अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर या सर्वांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई प्रभादेवी सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांची उपस्थिती होती. शिवाय सोनी टिव्हीचे अजय भाळवणकर, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्य जत्राच्या टिमधील वनिता खरात, अमित फाळके, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळे या कलाकारांची देखील विशेष उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.