हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राजकारणात सक्रिय असलेले मराठी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते असले तरी त्यांनी आपल्यातला कलाकार नेहमी जिवंत ठेवलाय हे आपण सारेच जाणतो. ऐतिहासिक भूमिकांमधून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. लवकरच ‘शिवप्रताप गरुडझेप’ नव्या आगामी चित्रपटातून ते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या ऐतिहासिक चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून या चित्रपटाची झलक टिझरद्वारे शेअर केली आहे. या टिझर व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘शिवप्रताप – गरुडझेप….. “सप्टेंबर 2022” चित्रपटगृहात…..जय शिवराय.. हर हर महादेव!’ या टीझरमध्ये अमोल कोल्हे यांच्या खणखणीत आवाजातील काही संवाद ऐकू येतात. ‘३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला थरारला होता.. मुघलशाही हादरली होती कारण.. याच वास्तूने पाहिलं होत मराठी स्वाभिमानाचं स्फुलिंग.. या हिंदुस्थानानं अनुभवला होता हा ‘शिवप्रताप’!’ सध्या हा टिझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट एक नवे इतिहासाचे पान उलगडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवा थरार अनुभवायला तयार व्हा. जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित हा चित्रपट घेऊन येतोय आग्र्याहून सुटकेचा थरार. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम यांनी केले आहे. या चित्रपटाची विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा दिसून येणार आहेत. दर्जेदार गाणी, टोकदार संवाद आणि थरारक ॲक्शन घेऊन लवकरच हा चित्रपट याच वर्षात सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post