हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । प्रसिद्ध लेखक-सिने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज केला आहे. या ऐतिहासिक चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचे सेनापतीपद भूषविणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या शौर्याची कथा पाहायला मिळणार आहे. स्वतः प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्यांनी आपले वजनही वाढवलं आहे.या ‘ऐतिहासिक व्यक्तिरेखा या तरुणांना प्रेरणा देणाऱ्या असतात, त्यामुळे त्या साकारताना कलाकारांनी तशी शरीरयष्टी कमावणेही गरजेचं आहे,’ असं प्रवीण तरडे सांगतात.
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.