हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विजयादशमीचा मुहूर्त गाठून तमाम मराठी सिने रसिकांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. यानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवगर्जनेसह हा चित्रपट अनेक चित्रपट गृहात रिलीज झाला.
अगदी दोन ते तीन दिवसातच या चित्रपटाने शीर्षकानुसार गरुडझेप घेतली आहे. चित्रपट गृहांमध्ये शिवगर्जना देत मराठी प्रेक्षक शिवमय वातावरणात या चित्रपटाचा आनंद लुटत आहेत. या चित्रपटाने मुंबई, ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश इतकेच काय तर गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश यासह अगदी दिल्लीतही जोरदार मजल घेतली आहे. विविध भाषिक राज्यांतही या चित्रपटाने मुसंडी मारली आहे. सुरवातीला या चित्रपटाचे एका दिवसाला फक्त ५०० शो होत होते. मात्र प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता ५०० वरून आता ८०० शो करण्यात आले आहेत.
‘जगदंब क्रिएशन्स’ची निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या अन्य मुख्य भूमिका आहेत. डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. तसेच रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. शिवाय छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे.
Discussion about this post