हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा महाराष्ट्र दौरा सुरु असताना हा दौरा आता पुण्यात पिंपरी- चिंचवड येथे पोहोचला आहे. एकीकडे या महानाट्यावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र हे महानाट्य बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे, असे समोर येत आहे. नाटकाचे मोफत पास दिले नाहीत तर नाटकाचे सादरीकरण कसे होते तेच बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावर थेट भाष्य केले आहे. यावेळी त्यांचा संताप अगदीच स्पष्ट दिसून येत होता.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले कि, ‘एक पोलीस बांधव मोफत पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो, हे बघतो, बोलत असेल. तर गृहमंत्र्यांनी यांना समज द्यावी. अंगावर आलेले वर्दी ही केवळ अधिकाराची नाही तर त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची आहे, याच भान पोलिसांनी ठेवावं. यापूर्वी संभाजीनगर कोल्हापूर निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले. नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला आहे’.
पुढे म्हणाले कि, ‘शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो हेच पाहतो, अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली. माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशा प्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे. सर्वसामान्य नागरिक जो कर भरतात त्यातून आपला पगार होतो असे असताना छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी भीक मागता हे पोलिसांच्या उज्वल परंपरेला गालबोट लावणारे आहे. २६ /११ च्या वेळी तसेच कोविडच्या काळात पोलिसांनी प्राणांची परवा न करता कामगिरी बजावली या उज्वल परंपरेला क्षुल्लक स्वार्थापायी गालबोट लावणे योग्य नाही’, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी आपले परखड मत व्यक्त करत संताप दर्शविला आहे.
Discussion about this post