‘बाई वाड्यावर या..’; आता मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ‘या’ दिग्गज अभिनेत्यावरही येणार बायोपिक चित्रपट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक काळ होता जेव्हा काही अभिनेत्यांशिवाय चित्रपट चालायचेच नाहीत. याच अभिनेत्यांनी घडवली चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचा रसिकवर्ग. या कलाकारांनी रंगभूमीलाच कर्मभूमी मानले आणि प्रेक्षकांनाच माय बाप. अश्या कलाकारांनी चित्रपट सृष्टीला दिल्या अजरामर कलाकृती. यांपैकी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये जसे दादा कोंडके यांचे नाव घेतले जाते. तितक्याच आदराने दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्याही नावाचा उल्लेख केला जातो. आजवर चित्रपटसृष्टीत बरेच बायोपिक आले. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची पुरेपूर दाद मिळाली. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवरील चित्रपट हा असतो त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते. या भावनेसह आता लवकरच निळू फुलेंच्या जीवनाचा परिचय करून देणारा बायोपिक चित्रपट येणार आहे.
होय. निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहेत. रमेश तौरानी हे त्यांच्यावर बायोपिक बनवणार असल्याचे समजत आहे. रमेश तौरानी यांनी निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून चित्रपट बनवण्याचे अधिकार घेतले आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे. रमेश तौरानी यांचा हा दुसरा बायोपिक चित्रपट आहे. याआधी, त्यांनी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या जीवनाचे भाष्य करणारा बायोपिक चित्रपट बनवला होता.
निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३० सालामध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या घरात ११ बहिण भाऊ दाटीवाटीने राहत असे. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा-या पैशांवर जैसा तैसा संसार चालवत होते. लहानपणापासूनच निळूभाऊ अत्यंत खोडकर स्वभावाचे होते. बहिणींची खोड काढणे हा तर त्यांच्या दिनक्रमाचा एक भाग होता. मात्र त्यांच्यावर तितकंच प्रेमही होतं. बालपणापासूनच निळूभाऊंना अभिनयाची प्रचंड आवड होती. आपली आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये ‘येरा गबाळ्याचे काम नोहे ‘ हा वग लिहिला. त्यानंतर पु.ल. देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे’ ची भूमिका साकारली आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिका आणि सखाराम बाईंडरमुळे ते खर्या अर्थाने पूर्ण कलाकार म्हणून नावारूपास आले. यानंतर अनेक नाटक, सिनेमे त्यांनी गाजवले. सिंहासन चित्रपटातील पत्रकार ते विनोदी हास्यपात्र ते खलनायक अश्या सर्व भूमिका त्यांनी केल्या. पण प्रेक्षकांना भावला तो खलनायक.
निळू फुले यांच्या आवाजात एक कमालीचा भारदस्तपणा होता. घोगर्या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचा नव्हे तर पाहणाऱ्याच्या मनालाही भितीच्या कवेत घ्यायचा. त्यांचा आवाज त्यांची ओळख कधी झाली कळलंच नाही. निळू फुले यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची आजही कुणासोबत बरोबरी नाही. त्यांची बेरकी नजर, सूचक हावभाव आणि संवादाचे कौशल्य अफाट होते. हेच त्यांच्या खंबीर अभिनयाचे बलस्थान होते. काही कारणासाठी निळूभाऊ गावोगाव गेल्यानंतर तिथल्या शिक्षिका, नर्स त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. याचे कारण आम्ही काही वेगळे सांगायची गरज नाही. पण खरंतर हि त्यांच्या अभिनयाला मिळालेली खरी पावती होती. त्यामुळे अश्या कलाकारावर बायोपिक तो बनता है! सध्या या बायोपिकची चर्चा आणि उत्सुकता दोन्ही कमालीची सुरु आहे.