Take a fresh look at your lifestyle.

कलादिग्दर्शक राजू सापते आत्महत्येप्रकरणी बिजनेस पार्टनरला अटक; अन्य ४ जणांवर गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी मराठी कला विश्वातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश मारुती सापते यांनी ३ जुलै २०२१ रोजी आत्महत्या करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. तत्पूर्वी त्यांनी बनविलेला सुसाईड व्हिडीओ हा त्यांच्या आत्महत्येचे कारण सर्वांसमोर उघड करून गेला. यामुळे सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी तपासाला चांगलाच वेग आला आहे. दरम्यान त्यांच्या बिजनेस पार्टनरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकास अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या बिजनेस पार्टनरला मुंबईतून अटक केली असून त्याला रविवारी (दि. ४ जुलै २०२१) न्यायालयात हजर केले असता १० जुलै २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे चंदन रामकृष्ण ठाकरे असे नाव आहे. त्याच्यासह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), राकेश मौर्या, अशोक दुबे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींवर खंडणी, पैशाची जबरदस्तीने वसुली, विश्वासघात, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान राजेश सापते यांच्या पत्नी सोनाली राजेश सापते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे. त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत होता. याच जाचाला कंटाळून राजेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्यांची पत्नी सोनाली यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या आरोपींपैकी चंदन ठाकरे हा राजेश सापते यांचा बिझनेस पार्टनर आहे. तर दुबे, श्रीवास्तव आणि मौर्या हे लेबर युनियनचे मुख्य पदाधिकारी आहेत. शिवाय विश्वकर्मा हा ठेकेदार आहे. या लेबर युनियनच्या जाचाला कंटाळून मराठी चित्रपट – मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या या टोकाचे पाऊल उचलण्याला जबाबदार असणाऱ्या युनियन लेबरमधील राकेश मौर्या आणि त्याच्या सहकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रविवारी दुपारी गोरेगावच्या फिल्म सिटीबाहेर फिल्म स्टुडिओज सेटिंग अॅण्ड अलाईड मजदूर युनियनतर्फे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात उपस्थित कलाकार, दिग्दर्शक आणि कामगारांकडून राजू सापते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.