Video मागंच लागलीया ईडी! नेत्यांच्या नशिबी चौकशीचा फेरा; गंभीर वातावरणात कुल व्हा जरा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्याचं राजकारण असं काही ढवळून निघालंय कि बस्स काही बोलायची सोय नाही. कारण आजकाल कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या मागे ईडीची (ED) चौकशी लागलेली दिसतेय. त्यामुळे ज्याच्या त्याच्या पोतडीत किती आणि काय दडलंय हे हळूहळू बाहेर येतंय. त्यात एकमेकांवर चिखलफेक आणि आरोप्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या जीवाला जरा काही दम नाही. दरम्यान विरोधी पक्षाचे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असताना नेत्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करत आहेत. असं संपूर्ण राजकीय वातावरण गढूळ झालं असताना यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गमतीशीर गाणं तयार करण्यात आलंय. “लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी.. असे या गाण्याचे बोल आहेत आणि सध्या याच गाण्याचा बोलबाला सुद्धा आहे.
या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे गाण्याचे भन्नाट बोल. कमाल शब्दांसह जबरदस्त म्युझिक असलेलं हे गाणं चांगलंच हिट होताना दिसतंय. “पडलाय दणका, मोडलाय मणका, पडलीय चांगलीच पळी… कशी ही यायची पडी… लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी…” असे या गाण्याचे लक्षवेधी असे बोल आहेत. त्यामुळे विशेष करून आजचा तरुण वर्ग या गाण्याने चांगलाच ओढला आहे. या गाण्याची संकल्पना राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची आहे. तर प्रदिप कांबळे यांच्या कल्पनेतून या गाण्याची शाब्दिक रचना केली आहे. तसंच त्यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं सुद्धा आहे.
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या गाण्याविषयी बोलताना माध्यमांना सांगितले कि, ‘सध्या केंद्र सरकार ज्या पद्धतीने CBI आणि EDचा गैरवापर करतेय. रोज कोणाच्या तरी घरी वा ऑफिसवर CBI आणि ED चे छापे केंद्र सरकार टाकत आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकारमधले मंत्री, नेते जरा काही बोलले की लगेच ED चे छापे पडतात. दररोज टीव्ही लावला आणि बातम्या पहायला सुरुवात केली की रोज कुठल्या तरी मंत्र्याच्या घरी नाहीतर त्याच्या नातेवाईकांच्या घरी CBIचे छापे वा ED छापे टाकले जातात. त्या अनुषंगाने खरंतर हे गमतीशीर गाणं राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने तयार करण्यात आलं आहे.’
सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक ED च्या कारवाईनंतर कोठडीत आहेत. याशिवाय संजय राऊत, भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्राजक्त तनपुरे या नेत्यांचीही ईडीने चौकशी केली आहे.