आम्हाला “महाराज” तुम्ही दाखवले.. तुमची चेतना कालातीत आहे..! बाबासाहेब पुरंदरेंना आस्तादची भावमय आदरांजली
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवशाहीर आणि ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ नोव्हेंबर २०२१) सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी निधन झालं आणि एक ऐतिहासिक पर्व अनंतात विलीन झालं. त्यांच्या निधनामुळे खरतर इतिहासाला पोरकेपण आल्याची एक तीव्र जाणीव प्रत्येकाच्या मनाला बोचू लागली आहे. दरम्यान बाबासाहेबांचे अनेक कलाकारांसहदेखील जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी प्रत्येकाला चटका लावून गेली. यानंतर आता आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आस्ताद काळे याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, “तीनशे वर्षं!!!! तीनशे वर्षं महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंध:काळात चाचपडत होता!!! वर्षातल्या बाराही अमावास्यांनी..जणू गराडा घातला होता!!! महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती, गा-हाणं गात होती…….” माझ्या पिढीला “महाराज” तुम्ही दाखवलेत, शिकवलेत. माझ्याच काय, आधीच्या दोन-तीन पिढ्यांनाही. “आपला” हा डोळे दिपवणारा आणि मती गुंग करणारा इतिहास तुम्ही माझ्यासारख्या करोडोंसाठी “आपलासा” करून ठेवलात. त्या इतिहासाला नुसती सनांची वेष्टणं चढवून काहीसा रुक्ष न बनवता, त्याचं चित्तथरारक आणि अद्भुत कथा रुपांतर करून घरोघरी पोचवलात, त्याची गोडी लावलीत.(अर्थात त्याला कुठेही बाधा न पोचवता.)
शिवाजीराजे, तानाजीराव, नेतोजीराव, बाजीप्रभू, मुरारबाजी, येसाजीराव, कोंडाजीराव, हिरोजीराव, कान्होजी, बाजी, सर्जेराव, गोदाजी, बहिरजी, दादोजी, संभाजी कावजी, गोदाजी असे कितीतरी नरवीरांची, आणि जिजाऊसाहेब, धाराऊ, सईबाईसाहेब, काशीबाईसाहेब अशा कितीतरी माउल्यांची पहिली ओळख तुमच्यामुळे झाली. हे सारे माझ्यासह अनेकांसाठी कायमचे “SUPERHEROES” होऊन बसले ते तेव्हापासूनच. एवढं सगळं होऊनही तुमचं एक वाक्य आजही अचंबित करतं. “मला शिवराय फक्त ८% समजले.”!!!!!!
जवळजवळ ८ दशकं तुम्ही जो “एक मुजरा” करायला तळमळत असाल, तो तुम्हाला आता घालता आला असेल. तशी परवानगी राजांनीही दिली असेल तुम्हाला. तुमचा एक जीवाचा सवंगडीही भेटला असेल. पुन्हा “दुर्गभ्रमण” सुरू झालं असेल. हे सगळं असंच घडलं असणार असा माझा ठाम विश्वास आहे. कारण तुमची चेतना कालातीत आहे बाबा. ती कुठेही, कधीही स्वस्थ बसणार नाही. त्या चेतनेला, त्या ऊर्जेला…..आभार आणि आदरपूर्वक मुजरा”. हि संपूर्ण पोस्ट इतकी मनाला भिडणारी होती कि अनेकांनी यावर विविध प्रतिक्रियांमधून ते दर्शविले आहे.