Take a fresh look at your lifestyle.

लतादीदींच्या स्मरणार्थ मुंबईत कलिना कॅम्पसमध्ये उभारणार संगीत महाविद्यालय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आजच्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचे ठरवले होते याचे मला समाधान आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी लतादीदी यांचे निधन झाले. आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असे नाव दिले जाणार आहे.

 

संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे नाव दिले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.