अबोल प्रेमाचा रांगडा बाज..! कलर्स मराठीवर फुलणार नव्या प्रेमाचे रंग ते ही नव्या मालिकेतून
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम हि भावना जितकी सुखद तितकी त्रासदायक सुद्धा. थोडं अल्लड, थोडं हट्टी, थोडं निर्मण तर थोडं जिगरबाज असणार हे प्रेम कधी कुणाला काय करायला लावेल याचा अंदाज लावणे अगदी कठीणच. अश्या या प्रेमाचे नानाविध रंग असतात. आनंदी, सुखकर, आल्हाददायक तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत आपला माणूस ओळखत आणि मग हळू हळू जुळलेलं प्रेमाची परिभाषा उमगू लागते. अश्याच कळत नकळत जडणाऱ्या प्रेमाची अवघड भाषा सोप्पी करायला कलर्स मराठी घेऊन येत आहे नवी कोरी कथा. अंतरा आणि मल्हारचे प्रेम करणार कलर्सच्या मनोरंजनात भर.
आयुष्याचाही समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुद्ध, भिन्न स्वभावाच्या माणसांनी एकमेकाला साथ द्यायला हवी. हाच वेगळेपणा त्यांच्या प्रेमात नवेपण घेऊन येतो आणि मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. अशीच काहीशी अंतरा आणि मल्हारची गोष्ट. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये भयंकर तिरस्कार आहे. तिच्याचसोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर? त्या नात्याचं काय होणार आणि कस होणार? अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार जेव्हा लग्नासाठी तयार होतो. तेव्हा हा द्वेष घेईल का प्रेमाची जागा? हे पाहण्यासाठी तुम्हाला या दोघांची गोष्ट सांगणारी नवी कोरी मालिका ‘जीव माझा गुंतला’ पाहावी लागणार आहे.
एकीकडे नाती जपणारी अंतरा आणि दुसरीकडे व्यवहारापुढे नाती शून्य असलेला मल्हार एकमेकांच्या आयुष्यात कसे आपली जागा निर्माण करतात हे आपण या मालिकेत पाहणार आहोत. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते.
तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. अत्यंत मग्रूर ज्याच्यासाठी व्यवहार ही प्राथमिकता आहे. असे परस्परविरोधी मल्हार व अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याचे वळण त्यांना कुठे नेते हे पाहणे रंजक असणार आहे. या मालिकेतील मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौघुले साकारत आहे. तर अंतराची भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण साकारत आहे.