हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेसृष्टीवर प्रेक्षकांची बरीच नाराजी दिसून आली. ज्यामुळे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड जोरात चालला. दरम्यान आमिर खान आणि करीना कपूर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्ट २०२२ प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगलाच तोंडावर आपटला. या चित्रपटाने अतिशय शुल्लक कमाईतच गाजागोजा गुंडाळला होता. ज्यामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यानंतर हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर आपटलेला लाल सिंग चड्ढा ओटीटीवर मात्र गाजल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. हा चित्रपट बॉयकॉटच करणार अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली होती. मात्र तरीही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिल्याचे समोर येत आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट केवळ हिंदी भाषेतच नव्हे तर याव्यतिरिक्त इतर भाषेतही जोरदार कामगिरी करतो आहे. ज्यामुळे अगदी १० दिवसातच या चित्रपटाने ओटीटीवर आपला जम बसवल्याचे दिसून येत आहे.
विशेष सांगायचे म्हणजे, ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट एका आठवड्यातच नेटफ्लिक्सवर नंबर १ आणि भारतातील नंबर २ नॉन- इंग्लिश चित्रपट झाला आहे. हा चित्रपट सिंगापूर, ओमान, मॉरिशस, बांगलादेश, UAE, बहरीन, श्रीलंका आणि मलेशियासह जगभरातील १३ देशांमधील पहिल्या १० चित्रपटांच्या यादीत स्थित झाला आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि अगदी कलाकारांनीही आशा सोडली होती. मात्र आता ओटीटीवर चित्रपट चालतो आहे हे पाहून त्यांचाही जीव भांड्यात पडला असेल. आमिर खान प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान, मोना सिंग, नागा चैतन्य अक्किनेनी आणि मानव विज हे मुख्य भूमिकेत आहेत.
Discussion about this post