Take a fresh look at your lifestyle.

‘आरसा- द स्टेट्स’ लघुपटाची आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पी.एम.शाह फाउंडेशन आयोजित १०’ वा आरोग्य चित्रपट महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. दरम्यान विजेत्यांना पारितोषिक सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. या महोत्सवात माहितीपट विभागात दिनेश वसंतराव आखाडे दिग्दर्शित ‘रिबर्थ’ला प्रथम पुरस्कार तर डॉ. शेखर कुमार कुलकर्णी दिग्दर्शित ‘फॉर हर’ या माहितीपटाला द्वितीय पुरस्कार आणि प्रदीप कुमार अग्निहोत्री दिग्दर्शित ‘ऑटिझम – मुव्हिंग अहेड’ या माहितीपटाला तृतीय पुरस्कार मिळाला. तसेच लघुपट विभागात गणेश मोडक दिग्दर्शित व आशिष निनगुरकर लिखित ‘आरसा – द स्टेट’ या लघुपटास प्रथम पुरस्कार तर सुमीत पाटील दिग्दर्शित ‘लाल’ लघुपटास द्वितीय आणि सोनल राठोड दिग्दर्शित ‘ब्रा’ लघुपटाला तृतीय पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार श्री. सुखटणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आरसा हा लघुपट एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. आशिष निनगुरकर लिखित हा चित्रपट ‘हंगामा प्ले’ या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात लेखक एका मुलीची कथा मांडतोय. जिची आई कर्करोगाने ग्रासलेली आहे. ती मुलगी आपल्या आईला तिची काळजी घेण्याचे वचन देते. दरम्यान तिचे वचन पूर्ण करताना तिचा प्रियकर तिला सोडून देतो. तिच्या आयुष्यात फार कोलाहल निर्माण होते पण ती वादळात एकटेच झाड रहावे तशी उभी राहते आणि जिद्दीने लढते. हि कथा या चित्रपटात दर्शवलेली आहे.

दरम्यान प्रथम पुरस्कार प्राप्त ‘आरसा- द स्टेट्स’ या लघुपटाचा पुरस्कार लेखक आशिष निनगुरकरसह अभिनेत्री श्वेता पगार आणि अभिनेते प्रदीप कडू यांनी स्वीकारला. प्रथम पुरस्कार प्राप्त “आरसा” या लघुपटाची निर्मिती काव्या ड्रीम मुव्हीज आणि सौ. किरण निनगुरकर यांनी केली आहे. तर छायांकन योगेश अंधारे यांनी केले आहे. तसेच अशोक कुंदप आणि आशा कुंदप यांनी सहाय्यक निर्मिती केली आहे. याशिवाय लघुपटात श्वेता पगार यांच्यासह संकेत कश्यप,चैत्रा भुजबळ, गीतांजली कांबळी, डॉ.स्मिता कासार आणि वैष्णवी वेळापुरे या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुखटणकर यांनी व्यक्त होताना म्हटले कि, “पुर्वी चार मिनिटांचा चित्रपट बनविण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च करून रीळ आणावी लागायची. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया अतिशय खर्चिक होती. तसेच तो बनविताना काही बंधने असायची. मात्र अलीकडील काळात डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती माध्यमाचे लोकशाहीकरण झाले असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे. याशिवाय डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती ही केवळ काही श्रीमंत लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर गावागावात ते पोहचले आहे. मात्र लघुपट किंवा माहितीपट हे व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी ‘पहिले पाऊल’ नाही, तर तो एक स्वतंत्र विषय आहे. हे ही तरुण निर्मात्यांनी लक्षात घेतले पाहिजे”