पोलीस बॉईज आक्रमक! ‘रानबाजार’वर कारवाईची मागणी; सिरीजमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी ओटीटीवर धुमाकूळ घालणारी बोल्ड आणि थ्रिलर वेब सिरीज ‘रानबाजार’ हि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली आहे. अभिजीत पानसे दिग्दर्शित या वेबसीरिजचे कथानक राजकीय उलथापालथ यावर आधारित आहे. एक आगळं वेगळं कथानक आणि दर्जेदार भूमिका, अव्वल अभिनय आणि कमाल बॅकग्राउंड साउंड याने हि वेबसिरीज लक्षवेधी बनवली आहे. शिवाय या वेब सीरिजमधील प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड भूमिकांनी प्रेक्षकांना भारावून टाकलय. एकंदरच काय तर प्रेक्षक आणि समीक्षकांनी या वेब सीरिजला पूर्ण मार्क दिलेत. पण तरीही ‘रानबाजार’ अडचणीत येते का काय..? असे वाटू लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सिरीज विरोधात पोलीस बॉइज संघटना यांनी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमकता दाखवली आहे. याशिवाय या संघटनेकडून संपूर्ण राज्यभरात ‘रानबाजार’ला तीव्र विरोध केला जातोय. राज्यात ठिकठिकाणी पोलीस बॉइज संघटनेने ‘रानबाजार’ वेबसिरीजचे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस बॉइज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. इतकेच नव्हे तर, कारवाई न झाल्यास पुढे काय होईल हे तुम्ही बघालच असा इशारादेखील दिला आहे.
पोलीस बॉइज संघटनेने विरोध करण्याचे कारण सांगताना म्हटले आहे कि, ‘महाराष्ट्र पोलिसांकडे विविध जबाबदाऱ्या असतात. कोरोनाचा काळ असेल वा इतर दंगली असतील याठिकाणी पोलीस प्रशासन आपल्या जीवाची किंवा कुटुंबाची पर्वा न करता स्वतःला झोकून देते. जनतेच्या सेवेत ते नेहमीच तत्पर राहतात. मात्र या वेब सिरीजने या पोलीस प्रशासनाची प्रतिमा पूर्ण मलिन करून टाकल्याचा आरोप संघटनेने केलाय. रानबाजार वेबसिरीजमध्ये अनेक सीनमध्ये पोलिसांच्या तोंडी शिव्या घालून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अनेक सीनमध्ये पोलीस प्रशासन कशा पद्धतीने वागते अशा खोट्या गोष्टी दाखवून सीरीजचा टीआरपी वाढवण्याचा प्रकार लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केलाय. त्यामुळे जर या सिरीजच्या कलाकार, दिग्दर्शक आणि लेखकांवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर पोलीस बॉइज संघटना पूर्ण महाराष्ट्रभरातून आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे काय होईल हे सांगूही शकणार नाही, असा इशारा पोलीस बॉइज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला आहे.