हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत गाजलेली टीव्ही मालिका ‘महाभारत’ यामध्ये शकुनी मामांची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे आज निधन झाले आहे. अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत नाजूक होती. दरम्यान २ दिवसांपूर्वीच त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असताना आज अचानक त्यांची प्रकृती खालावली अन त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनाच्या काही तासांतच मनोरंजन विश्वाला गुफी पेंटल यांच्या निधनाचा दुसरा मोठा धक्का लागला आहे. यामुळे संपूर्ण कलाक्षेत्र दुःखाच्या महासागरात बुडाले आहे.
अभिनेता गुफी पेंटल हे दीर्घकालीन आजारपणामुळे बराच काळ रुग्णालयात दाखल होते. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वारंवार सांगितले जात होते. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली गुफी यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी उपचारात कोणतीही कमतरता सोडली नाही मात्र गुफी यांची सहनशक्ती अखेर लयास गेली अन झुंज थांबली. वयाच्या ७८ व्या वर्षी अभिनेते गुफी पेंटल याची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते गुफी पेंटल यांच्या पार्थिवावर आज ५ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता अंधेरीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अभिनेते गुफी पेंटल यांना आजही लोक टीव्ही मालिका ‘महाभारत’मधील शकुनी मामा म्हणून ओळखतात. याशिवाय त्यांनी ‘कर्मफलदाता शनी’ या मालिकेतही देव विश्वकर्मा यांची भूमिका साकारली होती. गुफी यांनी केवळ मालिकाच नव्हे तर चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा एक मोठा चाहतावर्ग होता. माहितीनुसार, गुफी पेंटल हे अभिनेता होण्यापूर्वी सैन्यात कार्यरत होते. मात्र त्यांचे बंधू अमरजीत पेंटल हे बॉलिवूड सिनेविश्वाचा एक भाग होते आणि त्यांना पाहून गुफी यांनीही मुंबई गाठली अन अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला. विविध टीव्ही मालिका तसेच हिंदी सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम करण्याशिवाय त्यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे.
Discussion about this post